ग्रामसेवकास सरपंचाकडून मारहाण
By admin | Published: March 12, 2017 01:55 AM2017-03-12T01:55:06+5:302017-03-12T01:55:06+5:30
मोबाईल न दिल्याच्या कारणावरून भाडभिडीच्या ग्रामसेवकास तेथीलच सरपंचाने १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता मारहाण केली.
आरोपीला अटक व सुटका : मोबाईल न दिल्याच्या कारणावरून झाले भांडण; भाडभिडी ग्रामपंचायतीमधील घटना
घोट : मोबाईल न दिल्याच्या कारणावरून भाडभिडीच्या ग्रामसेवकास तेथीलच सरपंचाने १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता मारहाण केली. याबाबतची तक्रार ग्रामसेवकाने घोट पोलीस मदत केंद्रात दाखल केल्यानंतर सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
एकनाथ भुरसे सरपंच ग्रामपंचायत भाडभिडी असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. ग्रामसेवक वसंत मधुकर पवार हे ग्रामपंचायत कार्यालयात बसून प्रशासकीय कामे करीत होते. दरम्यान सरपंच एकनाथ भुरसे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ग्रामसेवकांचा मोबाईल मागितला. मात्र मोबाईलचा कव्हरेज नसल्याने ग्रामसेवकांनी मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान सरपंच भुरसे यांनी ग्रामसेवक पवार यांना शिविगाळ केली. मी तूला सोडणार नाही, असे म्हणून मारहाण केली व टेबलावरील कागदपत्रे, फाईल अस्ताव्यस्त फेकून दिल्या. याबाबतची तक्रार ग्रामसेवकाने घोट पोलीस मदत केंद्रात दाखल केली. त्यानुसार घोट पोलिसांनी सरपंच एकनाथ भुरसे यांच्या विरोधात ३५३, २२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सरपंच भुरसे यांना अटक केली. भुरसे यांना शनिवारी आरमोरी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश जायभाये करीत आहेत. (वार्ताहर)