ग्रामसेवकांच्या समस्या शासन दरबारी मांडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:52 PM2017-12-10T23:52:30+5:302017-12-10T23:53:45+5:30
ग्रामसेवक हा गावपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणारा महत्त्वाचा कर्मचारी आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : ग्रामसेवक हा गावपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणारा महत्त्वाचा कर्मचारी आहे. पूर्वीच्या तुलनेत आता ग्रामपंचायत स्तरावरील कामांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात अनेक ग्रामसेवक सेवा देऊन गाव विकासात सहकार्य करीत आहेत. मात्र या ग्रामसेवकांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. या समस्या आपण आग्रहीपणे शासन दरबारी मांडणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी स्थानिक आरमोरी मार्गावरील सूप्रभात मंगल कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय ग्रामसेवक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जि.प. कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अशोक थूल व राज्याध्यक्ष रमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, शालिक धनकर, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, ग्रामसेवक हा गावाचा सेवक तर सरपंच हा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे ग्रामसेवकाला गावाचा मुख्य सचिव मानायला हरकत नाही. गाव विकासाची सर्व जबाबदारी सचिवावर असते. कोणताही दाखला हवा. संबंधितांना सचिवाकडेच जावे लागते. नरेगासह विविध योजना व विकासाचे कामे करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या मागण्या सरकार दरबारी मांडू, असे त्यांनी सांगितले.
संघटनेतर्फे खासदारांचा सत्कार
याप्रसंगी ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने खासदार अशोक नेते यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, नवलाजी घुटके व इतर पदाधिकाºयांनी सत्कार केला.
याप्रसंगी जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी भाषणातून ग्रामसेवक व जि.प. कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मांडल्या. यावेळी ते म्हणाले, विद्यमान सरकार ग्रामसेवक व जि.प.च्या विविध आस्थापनातील रिक्त पदे भरण्यास विलंब करीत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केवळ १२ हजार रूपयांच्या अनुदानात शौचालयाचे बांधकाम करणे शक्य होत नाही. संगणक चालकांची पदे रिक्त असल्याने ग्रामसेवकांना कारभार सांभाळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने ग्रामसेवकांची रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी चिलबुले यांनी केली.