ग्रामपंचायतचे पदाधिकारी अस्तित्वात नसतानाही ग्रामसेवकाने काढले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2016 01:35 AM2016-07-06T01:35:06+5:302016-07-06T01:35:06+5:30

भामरागड तालुक्यातील इरकडुम्मे ग्रामपंचायतीत सर्व पद रिक्त आहेत. सरपंच, उपसरपंचही अस्तित्वात ...

Gramsevtech's office did not even exist when the office-bearer of Gram Panchayat did not exist | ग्रामपंचायतचे पदाधिकारी अस्तित्वात नसतानाही ग्रामसेवकाने काढले पैसे

ग्रामपंचायतचे पदाधिकारी अस्तित्वात नसतानाही ग्रामसेवकाने काढले पैसे

Next

भामरागड तालुक्यातील प्रकार : चौकशीची माजी ग्रा.पं. सदस्याची मागणी
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील इरकडुम्मे ग्रामपंचायतीत सर्व पद रिक्त आहेत. सरपंच, उपसरपंचही अस्तित्वात नसलेल्या तारखेत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्यांच्या नावे बँकेतून आर्थिक व्यवहार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात इरकडुम्मे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मोहन इरपा कुळमेथे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व या प्रकरणी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी केली आहे.
इरकडुम्मे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल २०१५ ला लागली होती. परंतु एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने सर्व पद रिक्त राहिले. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१५, १९ डिसेंबर २०१५ व १७ एप्रिल २०१६ ला पुन्हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. परंतु त्यावेळी एकही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे सर्व पद रिक्त राहिले. असे असताना इरकडुम्मे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपसरपंच पदावर असल्याचे दाखवून त्यांच्या मार्फत तेरावा वित्त आयोग, ३०५४ जिल्हा वार्षिक योजना, २५१५ जिल्हा वार्षिक योजना, सामान्य फंड, मागास क्षेत्र अनुदान निधी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आदींमधून फंडाची उचल धनादेशाच्या माध्यमातून बँकांमधून केली. ही बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात संबंधित ग्रामसेवकाकडून निधीचा अपहार झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मोहन इरपा कुळमेथे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. सचिव व उपसरपंच यांनी २२ जून २०१६ रोजी धनादेश क्रमांक १५७९९० खाता क्रमांक ६००५०२०५२२९ मधून एक लाख रूपये रोख रक्कम सही व शिक्क्याद्वारे काढली, अशी माहिती कुळमेथे यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

कसा झाला घोटाळा

ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने ग्रामपंचायतीचे सर्व पद रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीचे सदस्यच अस्तित्वात नसताना उपसरपंचाची सही घेऊन ग्रामसचिवाने एक लाख रूपयांची उचल धनादेशाच्या आधारे करून शासनाची दिशाभूल केली आहे व हा निधी उचलला आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा इरकडुम्मे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत घडला आहे.

Web Title: Gramsevtech's office did not even exist when the office-bearer of Gram Panchayat did not exist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.