गुंडापुरीत 'गुंडाराज'... आजी-आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या
By संजय तिपाले | Published: December 7, 2023 05:15 PM2023-12-07T17:15:41+5:302023-12-07T17:18:51+5:30
तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरले: संपत्तीच्या वादातून संपविल्याचा संशय.
संजय तिपाले,गडचिरोली: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृध्द आजी- आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपासचक्रे गतिमान केली आहेत. दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुंडापुरी येथील एका कुटुंबात वृध्द आजी- आजोबा राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह मरकल (ता.एटापल्ली) येथील तरुणाशी झालेला आहे. या गावातील मुलीची कन्या दिवाळीसाठी आजोळी गुंडापरीला गेली होती. या घटनेत तिलाहीआपला जीव गमवावा लागला. अर्चना रमशे तलांडे (१०,रा.येरकल ता.एटापल्ली) असे तिचे नाव असून ती चौथीच्या वर्गात शिकत होती.
आजी-आजोबांसह अर्चनाचा गळा चिरलेला मृतदेह ७ डिसेंबरला घरात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी एटापल्लीच्या कांगुली बुर्गी ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. हत्या नेमकी कोणी केली व संपत्तीचा वाद नेमका कोणासोबत होता,या बाबींच्या आधारे तपास सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु आहे. या पार्श्वभूमीवर १८ दिवसांत चौघांची हत्या झाली आहे. त्यातच गुंडापुरीतील घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना नक्षल्यांशी संबंधित नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) अशी मयत आजी-आजोबांची नावे आहेत.
ही घटना वैयक्तिक संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. योग्य तो तपास करुन आरोपींना जेरबंद केले जाईल. नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली