निराधार, वृद्ध कलावंतांचे अनुदान द्या
By admin | Published: June 4, 2016 01:19 AM2016-06-04T01:19:32+5:302016-06-04T01:19:32+5:30
श्रावण बाळ निराधार योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान तसेच वृद्ध कलावंतांना दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळालेले नाही.
तीन महिने उलटले : तहसीलदारांना युवक काँग्रेसचे निवेदन
आरमोरी : श्रावण बाळ निराधार योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान तसेच वृद्ध कलावंतांना दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे वृद्ध निराधार व वृद्ध कलावंतांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. लाभार्थी वारंवार बँकेत जाऊन अनुदान जमा झाले की नाही, याची खात्री करून घेत आहेत. परिणामी त्यांना नाहक हेलपाटा माराव्या लागत आहेत. त्यामुळे वृद्ध निराधार व वृद्ध कलावंतांना तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन तहसीलदार मनोहर वलथरे यांनी स्वीकारले.
निवेदन देताना मिलिंद खोब्रागडे, साबीर शेख, पंकज टेंभुर्णे, रूपेश फुलाबंधे, विनोद हेडाऊ, प्रशांत कतरे, आकाश सेलोकर, आसीफ शेख, सुनील भर्रे, सागर भोयर, विलास हारगुळे, निकेश फुलबांधे, दिलीप हाडगे उपस्थित होते. (वार्ताहर)