जिल्ह्यात ३०२ घरकूल मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 12:49 AM2017-01-14T00:49:15+5:302017-01-14T00:49:15+5:30

रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात शासनाने एकूण ६८० घरकुलाचे उद्दिष्ट दिले आहे.

Granting of 302 homesteads in the district | जिल्ह्यात ३०२ घरकूल मंजूर

जिल्ह्यात ३०२ घरकूल मंजूर

Next

कार्यवाही गतीने सुरू : रमाई आवास घरकूल योजना
गडचिरोली : रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात शासनाने एकूण ६८० घरकुलाचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी डिसेंबर २०१६ अखेर ३०२ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी हे घरकूल बांधून देण्याची कार्यवाही प्रशासनातर्फे गतीने सुरू करण्यात आली आहे.
१५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना जाहीर करण्यात आली. सुरुवातीला या योजनेंतर्गत घरकुलाच्या अनुदानाची किंमत मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी ७० हजार रूपये होती. सदर योजना ही ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. ग्रामविकास विभागाने इंदिरा आवास योजनेच्या अनुदानात ७० हजार रूपयांवरून एक लाख रूपयांची वाढ केली व यासंदर्भाचा शासन निर्णय ७ नोव्हेंबर २०१३ रोजी जारी केला. त्यानुसार रमाई आवास घरकूल योजनेची अनुदान मर्यादा एक लाख रूपये करण्यात आली. वाढत्या महागाईनुसार घरकुलाचे बांधकाम साहित्याच्याही किंमती वाढल्या. त्यामुळे अल्पशा अनुदानात घरकुलाचे बांधकाम करणे शक्य नाही, असे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांच्या लक्षात आले. या प्रश्नाचा राज्य सरकारनेही गांभीर्याने विचार केला व त्यानंतर ३० सप्टेंबर २०१६ रोजी अनुदान मर्यादा वाढविण्याचा नवा शासन निर्णय निर्गमित केला. या जीआरनुसार रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागासाठी १ लाख ३२ हजार रूपयांचे अनुदान निश्चित करण्यात आले. अनुदानात वाढ केल्यामुळे आता रमाई घरकूल योजनेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे.
रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत गडचिरोेली जिल्ह्याला एकूण ६८० घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट दिले. यामध्ये अहेरी तालुक्याला ९४, आरमोरी ६४, भामरागड ६, चामोर्शी ९१, देसाईगंज ८०, धानोरा २२, एटापल्ली १६, गडचिरोली ११९, कोरची १९, कुरखेडा ५१, मुलचेरा १५ व सिरोंचा तालुक्याला १०३ घरकुलाचे उद्दिष्ट आहे. अहेरी तालुक्यात २० घरकूल मंजूर करण्यात आले असून आरमोरी ५७, भामरागड २, चामोर्शी ३६, देसाईगंज ११, धानोरा १९, एटापल्ली ८, गडचिरोली ८९, कोरची १४ व सिरोंचा तालुक्यात ३० घरकुलांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात येत असल्याने त्यांचे सबलीकरण होताना दिसून येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबाची राहणीमान व उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी सदर विभागाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. या घटकातील वंचितांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासनाने रमाई घरकूल योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय अलिकडेच घेतला आहे. भाजप प्रणीत केंद्र व राज्य शासनाने घरकूल योजनेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

४६४ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी
रमाई आवास घरकूल योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ४६४ लाभार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ३८, आरमोरी ५७, भामरागड ३, चामोर्शी ७६, देसाईगंज ४६, धानोरा १९, एटापल्ली १३, गडचिरोली १०२, कोरची १७, कुरखेडा ४४, मुलचेरा ७ व सिरोंचा तालुक्यातील ४२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. लाभार्थी बांधकाम साहित्याची जुळवाजुळव करीत आहेत.

Web Title: Granting of 302 homesteads in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.