नाल्यांवर गवताचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:09 AM2017-11-11T00:09:41+5:302017-11-11T00:09:59+5:30
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून रस्त्याने ये-जा करणारे वयोवृद्ध नागरिक व बालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने ....
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूड : देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून रस्त्याने ये-जा करणारे वयोवृद्ध नागरिक व बालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाली स्वच्छता व कचºयाचे उच्चाटन करावे, अशी मागणी कुरूडवासीयांनी केली आहे.
शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी शासनस्तरावर योजना राबवून लोकहिताचे कार्य करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे. परंतु कुरूड गावात जिकडे तिकडे नाल्यांवर गवत उगविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाल्यामध्ये घाण तसेच सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. उगवलेल्या गवतामुळे व काडीकचºयामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली असून विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे.
दिवसा व रात्रीच्या वेळेस फिरावयास जाणारे वयोवृध्द यांना नाल्यावरती उगवलेल्या गवतामुळे सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. नाल्यांचा योग्य अंदाज येत नसल्याने दुचाकी नाली कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गावाच्या स्वच्छतेकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने काही ठिकाणी दुर्गंधीही येत आहे. या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे समस्या मांडली होती. मात्र ग्रा.पं. प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्व नाल्यांचा उपसा करावा, तसेच गवत नष्ट करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.