अहीर यांच्याकडून मोठी आशा
By admin | Published: November 10, 2014 10:43 PM2014-11-10T22:43:20+5:302014-11-10T22:43:20+5:30
गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते
प्रलंबित समस्या मार्गी लावतील : रेल्वे, केंद्राशी संबंधित प्रकल्प रखडले
गडचिरोली : गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते या मंत्रालयाचा कारभार आहे. त्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळेल, अशी आशा या जिल्ह्यातील जनतेला आहे.
गडचिरोली हा देशातील २५ अतिमागास जिल्ह्यात समाविष्ट असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम मागील १५-२० वर्षांपासून रखडले आहे. वडसा-गडचिरोली हा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी या भागातील जनतेची आहे. खासदार अहीर हे दोन वेळा गडचिरोली-चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. अहीर यांच्या या लोकसभा क्षेत्रात गडचिरोली व अहेरी हे विधानसभा मतदार संघ त्यावेळी समाविष्ट होते. त्यांना या भागातील समस्यांची जाण आहे. वेळोवेळी त्यांनी खासदार म्हणून या जिल्ह्यातील अनेक प्रश्न संसदेत मांडले आहेत.
बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली-सुरजागड हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या कार्यकाळात केली होती. या मार्गाच्या सर्वेक्षण कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. चेन्ना हा मोठा सिंचन प्रकल्प वनकायद्याच्या अडचणीमुळे रखडलेला आहे. अहीर आता केंद्रीय मंत्री झाल्यामुळे त्यांनी चेन्ना प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील जनतेची व शेतकऱ्यांची आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन अहीर यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे ओबीसी संघटनेच्यावतीने आमरण उपोषण आपल्या प्रलंबित प्रश्नांबाबत करण्यात आले होते. त्यावेळीही खासदार अहीर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आता अहीर यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागासवर्गीय (ओबीसींचे) प्रश्न मार्गी लावावे, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करून द्यावे, अशी मागणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रसायन व खत उद्योग उभे करण्याबाबतही अहीर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे. या भागात पूर्वी देसाईगंज येथे खत कारखाना होता. तो बंद पडला आहे. त्यामुळे नवा खत कारखाना सुरू करण्यासाठीही अहीर यांनी राज्यात गडचिरोलीचा विचार करावा, अशी मागणी या जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)