हरित सेना बस आलापल्लीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 01:28 AM2017-05-04T01:28:00+5:302017-05-04T01:28:00+5:30
वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून
वृक्ष लागवडीबाबत जनजागृती : पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी
आलापल्ली : वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून सदर बस बुधवारी आलापल्लीत दाखल झाली. सदर बसला पुढच्या प्रवासासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखविली.
पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे. सदर उपक्रम तीन टप्प्यात राबविला जाणार आहे. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वन विभाग, ग्राम पंचायत मिळून ४ कोटी वृक्षांची लागवड करणार आहे व इतर विभाग ७५ लाख वृक्ष लावणार आहेत. २०१८ मध्ये १३ कोटी व २०२१ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व नागरिकांना कळावे व नागरिकांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने हरीत सेना (ग्रीन आर्मी) ही बस तयार केली आहे. ही बस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हरीत सेना प्रतिनिधींची नोंदणी करणार आहे. बसच्या मागच्या बाजूस मोठी एलईडी टीव्ही लावण्यात आली आहे. या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीची माहिती दिली जात आहे. गाडीच्या आतील भाग वातानुकुलीत असून २० एलईडी टीव्ही लावण्यात आल्या आहेत. वन विभाग महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पांढऱ्या शुभ्र रंगाची बस आलापल्लीत दाखल होताच सदर बस पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बस आल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. आलापल्लीवरून सदर बस पुढच्या प्रवासासाठी निघाली. (प्रतिनिधी)