आज महामानवाला जिल्हाभरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 01:24 AM2017-04-14T01:24:02+5:302017-04-14T01:24:02+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती : व्याख्यानमाला, प्रबोधन, भीमगीत, भीमरॅली आदी कार्यक्रम होणार
गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन १४ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २९ एप्रिल १९५४ ला गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे आले होते. या घटनेला यावर्षी ६३ वर्ष पूर्ण होणार आहे. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गावागावांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली - स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा केंद्र व पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्रा. देवेंद्र इंगळे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर उपस्थित राहतील. या व्याख्यान कार्यक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव दीपक जुनघरे यांनी केले आहे.
कॉम्प्लेक्स परिसरात जयंती कार्यक्रम
बौद्ध समाज मंडळ सोनापूर कॉम्प्लेक्सच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्रावस्ती बुद्ध विहारात १४ एप्रिलला सकाळी ८ वाजता ध्वजारोहण व बुद्ध वंदना, ८.३० वाजता समाजप्रबोधन कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पाणीपुरवठा सभापती किशोर निंबोळ, नगरसेवक संजय मेश्राम, माजी पोलीस पाटील मारोती मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक अॅड. कविता मोहरकर, अॅड. शांताराम उंदीरवाडे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. मिलींद रामटेके उपस्थित राहतील. यावेळी प्रा. नेहा महाजन, सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी १ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा, मेनबत्ती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा होईल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा होईल. सायंकाळी ५.३० वाजता शहरातून मिरवणूक काढली जाईल. सायंकाळी ७.३० वाजता स्नेहभोजन, ८.३० वाजता संगीत कार्यक्रम होईल. सदर कार्यक्रम प्रमिला अलोणे व त्यांचा संच सादर करणार आहे.
धानोरात कार्यक्रम
धानोरा - बौद्ध समाज, सामाजिक बौद्ध समाज विकास बहुउद्देशीय संस्था, जयभीम युथ फेडरेशन व प्रकाश बौद्ध महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक प्रबोधन कार्यक्रम होईल. १४ ला ग्रामीण रूग्णालय धानोराच्या वतीने नि:शुल्क आरोग्य शिबिर, जयभीम युथ फेडरेशनच्या वतीने रक्तदान शिबिर, भव्य फुले-शाहू-आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनी व विक्री स्टॉल लावले जाणार आहे. दरम्यान पाहुण्यांचे मार्गदर्शन, ध्वजारोहण, मिरवणूक व रात्री भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम नृत्यासह चंद्रपूर ग्रुप सादर करणार आहे.
भेंडाळा येथे भीमगीत कार्यक्रम
प्रबुद्ध युवा मंडळ भेंडाळाच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर १४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भीमगीत व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात भीमगीतकार संविधान मनवरे हे प्रबोधन करणार आहेत.
गडचिरोलीत भीम पहाट
आधार फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी ५.३०. वाजता येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात भीम पहाट हा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आधार फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, सचिव सुनीता साळवे, नगरसेविका माधुरी खोब्रागडे, नगरसेवक संजय मेश्राम, शिक्षण सभापती अॅड. नितीन उंदीरवाडे यांनी केले आहे.
हेमलकसा येथे सांस्कृतिक कार्यक्रम - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त गोटूलभवन हेमलकसा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसभा हेमलकसा भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समिती यांनी केले आहे.
पंचशील बुद्धविहार रामनगर, गडचिरोली - गडचिरोली शहरातील पंचशील बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय गोकुलनगर, फुले वॉर्ड तसेच शहरातील विविध भागात डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सायंकाळच्या सुमारास येथील मुख्य मार्गावरून इंदिरा गांधी चौकातून भीम रॅली काढण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१४ एप्रिल हा ज्ञानदिन म्हणून साजरा होणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न्यूयार्क येथील कोलंबिया विद्यापीठाने एल. एल. डी. तर हैैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने सन १९५३ मध्ये डी. लिट पदवी प्रदान केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्युच्च पदवीधारक होते. त्यांनी प्राप्त केलेल्या या असंख्य पदव्या पाहता त्यांची असलेली ज्ञान लालसा दिसून येते. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अखंड आयुष्यात विविध विषयांचा अभ्यास केलेला होता. अशा या ज्ञान महर्षीचा जन्म दिवस १४ एप्रिल हा ‘ज्ञान दिवस’ म्हणून राज्यात दरवर्षी साजरा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधिन होता. त्यानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १३ एप्रिल २०१७ रोजी नवा शासननिर्णय निर्गमित करून १४ एप्रिल हा ज्ञानदिन म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १४ एप्रिल हा ज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा होणार आहे. कार्यक्रमात ज्ञान दिवसाच्या आयोजनाचा उद्देश विशद करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासलेल्या विविध विषयाची ग्रंथसंपदा आदींबाबतची माहिती व्याख्यानातून देण्यात यावी, असे जीआरमध्ये म्हटले आहे.