लग्नाच्या चाैथ्या दिवशी बुडून नवरदेवाचा मृत्यू
By दिगांबर जवादे | Published: June 11, 2024 10:06 PM2024-06-11T22:06:31+5:302024-06-11T22:06:43+5:30
साळ्याला वाचविताना भाऊजीचाही मृत्यू
दिगांबर जवादे, गडचिराेली : लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसाेबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविताना भाउजीचाही मृत्यू झाल्याची घटना ११ जून राेजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.नवनीत राजेंद्र धात्रक (२७) रा. चंद्रपूर असे साळ्याचे तर बादल श्यामराव हेमके (३९) रा. आरमाेरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
नवनीत यांचे ७ जून राेजी लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक हाेते. ते भामरागड येथे राहत हाेते. हेमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले हाेते. नवनीत हा धबधब्यात आंघाेळ करत असताना खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले. मात्र दाेघांनाही पाेहता येत नसल्याने दाेघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती लाहेरी पाेलिस मदत केंद्राला देण्यात आली. दाेघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. लाहेरी पाेलिस मदत केंद्रात संपूर्ण कुटुंबाचे बयाण घेतले जात हाेते.
मेहंदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यू
लग्नाला अगदी चार दिवस झाले हाेते. नवनीत व त्यांची पत्नी दाेघेही फिरण्यासाठी बिनागुंडा येथे आले हाेते. दाेघांनीही सुखी संसाराचे स्वप्न बघितले हाेते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले. अवघ्या चार दिवसांतच नवनीतने जगाचा निराेप घेतला. त्यामुळे नवविवाहितेवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.
कठडे लावण्याची गरज
बिनागुंडा येथील धबधबा दिसायला अतिशय लहान आहे. मात्र या धबधब्यात उन्हाळ्यातही जवळपास १५ ते २० फुट पाणी असते. धबधब्याची ही खाेली लक्षात येत नाही. त्यामुळे धबधब्यात बुडून मृत्यू हाेतात. यापूर्वी भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या नागालॅंड येथील डाॅक्टरचा मृत्यू झाला हाेता. भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या ठिकाणी लाेखंडी खांब उभारावेत. जेणेकरून नागरिक खाेल पाण्यात जाणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
पाेहता येत नसल्याने झाला घात
मृतक नवनीतला पाेहता येत नव्हते. तरीही ताे खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न बादल यांनी केला. बादल यांनाही पाेहता येत नव्हते. साळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भाऊजीचासुद्धा मृत्यू झाला. एकाच नात्यातील दाेघांचा मृत्यू झाला. हेमके व धात्रक कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.