शहरात होणार भूमीगत वीज केबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:18 AM2018-01-03T00:18:17+5:302018-01-03T00:18:43+5:30
केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे २० किलोमीटरवर भूमीगत वीज केबल टाकले जाणार आहेत. याची निविदा निघाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे २० किलोमीटरवर भूमीगत वीज केबल टाकले जाणार आहेत. याची निविदा निघाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.
गडचिरोली शहरात चामोर्शी मार्ग, मूल मार्गावरील इंदिरा गांधी चौक ते कारगील चौैकापर्यंत जवळपास १ किमी मार्गावरच वीज लाईन भूमीगत टाकण्यात आली आहे. शहरातील उर्वरित वॉर्डांमध्ये मात्र खांबांच्या माध्यमातूनच वीज पुरविली जात आहे. खांबांवर घरगुती तारांचे जाळे पसरल्याचे दिसून येते. एखाद्या व्यक्तीची वीज खांबांवरून वीज गेल्यास ती दुरूस्त करताना तीन ते चार नागरिकांच्या घरातील वीज बंद पडते. यामुळे शहरवासीय व वीज कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. काही खांब व विजेच्या तारा इमारतींना अगदी रेटून आहेत. संरक्षणासाठी या तारांवर प्लास्टिकचे पाईप टाकण्यात आले आहेत. तरीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्या तारांमुळे वीज चोरीचेही प्रमाण वाढते. हा कटू अनुभव लक्षात घेऊन राज्यभरातील शहरांमध्ये भूमीगत वीज केबल टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत आता गडचिरोली शहरातील विविध वॉर्डामध्ये सुमारे २० किमी भूमीगत केबल टाकले जाणार आहेत. यामध्ये बहुतांश शहराचा भाग व्यापणार आहे. यामध्ये १२ किमीची उच्चदाब वाहिनी व ८ किमीची लघुदाब वाहिनी राहणार आहे.
विजेची समस्या लक्षात घेऊन भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून शहरवासीयांकडून होत होती. मात्र निधी मिळत नसल्याने काम होत नव्हते. भूमीगत वीज लाईनचे अनेक फायदे असल्याने गडचिरोली शहराचा कायापालट होण्यात भूमीगत वीज केबलचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे.
भूमीगत वीज वाहिनी कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. १८ महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदाराला काम पूर्ण करायचे आहे. वीज विभागाने भूमीगत वीज वाहिनी टाकण्याबाबत नगर परिषदेकडे परवानगी घेण्याबाबतचे पत्र मंगळवारी सादर केले आहे. नगर परिषदेची परवानगी मिळताच कामाला सुरुवात होणार आहे. ठरवून दिलेल्या कालावधीत काम करून देणे कंत्राटदाराला सक्तीचे आहे. अन्यथा संबंधित कंत्राटदारावर दंड ठोठावला जाणार असल्याने काम तत्काळ होईल, यादृष्टीने कंत्राटदार व महावितरण प्रयत्नशील आहे. त्यामुळे कामाला लवकर सुरुवात होण्याबरोबरच कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे.
गडचिरोली व देसाईगंजात उपकेंद्रांचे काम सुरू
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत गडचिरोली व देसाईगंज शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देसाईगंज व गडचिरोली शहरात सुमारे ३३ के व्हीचे दोन वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहेत. गडचिरोली येथील सेमाना देवस्थान ते कॉम्प्लेक्स मार्गाच्या बाजूला उपकेंद्र निर्मितीचे काम सुरू झाले आहे. तसेच देसाईगंज येथे लाखांदूर मार्गावर सुद्धा उपकेंद्र बांधले जात आहे. या दोन उपकेंद्रांचे बांधकाम व ४५ किमीच्या वीज वाहिनीसाठी सुमारे १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
देसाईगंज व गडचिरोलीत बसविणार ३५ ट्रान्सफॉर्मर
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गतच गडचिरोली व देसाईगंज शहरांमध्ये ३५ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले जातील. जुन्या २६ ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली जाणार आहे. त्याचबरोबर या शहरांमध्ये १६ किमीची नवीन लघुदाब वाहिनी टाकली जाणार आहे. तर जुन्या १० किमी लघुदाब वाहिनीची क्षमता वाढविली जाणार आहे. नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे शहरातील विजेची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागात १५९ नवीन ट्रान्सफॉर्मर
दीनदयाल योजनेअंतर्गत धानोरा तालुक्यातील चातगाव व कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे ३३ केव्हीचे दोन उपकेंद्र बसविले जातील. गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमधील ग्रामीण भागात १५९ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले जातील. २१० किमीच्या नवीन उच्चदाब वाहिन्या तर ४० किमीच्या लघुदाब वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. १२ हजार ५०० बीपीएलधारकांना मोफत वीज जोडणी दिली जाणार आहे.