जगमपुरात नालीचे पाणी विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:31 AM2019-07-13T00:31:09+5:302019-07-13T00:31:36+5:30
चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जगमपूर गावातून जाणारा मुख्य रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. या रस्त्याच्या बाजूला जिल्हा परिषदेने आठ वर्षांपूर्वी नाल्यांचे बांधकाम केले. बांधकामापासून आतापर्यंत नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यासह गावातील अंतर्गत नाल्याही गाळ व कचऱ्याने तुडूंब भरल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा होणे आवश्यक असताना ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. नाल्यांमधील गाळामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातपंप, विहिरी व नागरिकांच्या दारावरून वाहत आहे.
चार दिवसांपूर्वी आमगाव (म.) परिसरात दमदार पाऊस झाला. त्यावेळी पावसाचे पाणी रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी सभोवताल जमा झाले होते. हेच पाणी विहिरीत गेले. गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी होत आहे.
चामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी बºयाच ग्रामपंचायतीमार्फत हद्दीतील गावांमधील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. काही ग्रामपंचायतींनी पावसाळापूर्व नियोजनच केले नाही. त्यामुळे सांडपाणी विल्हेवाटीची समस्या ऐरणीवर आली आहे.
लोकमतने वेधले होते लक्ष
२० जून रोजी लोकमतने जगमपूर येथील नाली उपसा न झाल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. नाली उपशाबाबत भाडभिडीचे ग्रामसेवक यांना विचारणा केली असता, २४ जून रोजी सभा आयोजित केली आहे. या सभेत नाली उपशाबाबतचा ठराव घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही नाल्या उपसल्या नाहीत. त्यामुळे अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे.