भूजल पातळी अर्ध्या मीटरने खोलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:45 PM2019-04-26T23:45:11+5:302019-04-26T23:45:48+5:30
भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात १३०० मिमी पाऊस पडते. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. पर्जन्यमान अधिक असल्याने पाणी पातळीही वरच राहत होती. जास्तीत जास्त मे महिन्यात थोडीफार पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. मात्र मागील काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही बोअर मारले जात आहेत. बोअर हे १०० ते २०० फुटापर्यंत राहतात. बोअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. सिंचन विहिरींच्या माध्यमातूनही पाणी उपसा होत आहे. मात्र पाणी साठून राहिल, यासाठी उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.
भूजल पातळी मोजण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग करतो. यासाठी बाराही तालुक्यात ११२ विहिरी ठरविण्यात आले आहेत. या विहिरींच्या निरिक्षणातून पाणी पातळीबाबतचा अंदाज बांधला जातो. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. यामध्ये आरमोरी व मुलचेरा तालुक्यात भूजल पातळी सर्वाधिक ०.६३ मीटरने खोल गेली आहे. धानोरा तालुक्याची भूजल पातळी ०.६१ मीटर, गडचिरोली ०.४३ मीटर, देसाईगंज ०.६० मीटर, अहेरी ०.३२ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.१३ मीटरने घटली आहे. दरवर्षी जवळपास अर्धा मीटरने भूजल पातळी घटत असल्याने ही भविष्यात धोक्याची घंटा ठरणारी आहे.
बोअर खोल खोदण्याची स्पर्धा थांबायला हवी
जमिनीत एका विशिष्ट पातळीपर्यंत पाणी मिळते. त्यानंतर पाणी मिळत नाही. त्यामुळे जेवढे खोल खोदू तेवढे पाणी अधिक मिळेल, हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. सद्य:स्थितीत विहिरींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील व हळूहळू १०० फुट खोल खोदलेल्या हातपंपातूनही पाणी येणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. तसेच जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरेल, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.