जलसंधारणाने भूजल पातळी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:07 PM2017-10-01T23:07:14+5:302017-10-01T23:07:29+5:30
चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.
२०१६-१७ या वर्षात जैरामपूर गावाची निवड करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर हे गाव शेतीच्या दृष्टीने अग्रगण्य असलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जातात. उन्हाळी हंगामात सुद्धा काही शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी असून गावात पाळीव प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे असून लागवडीखालील क्षेत्र ४६१.१७ हेक्टर एवढे आहे. शेतीसाठी ९९०.२५ टीएमसी व मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी ४२.५९ टीएमसी म्हणजेच एकंदरीत जैरामपूर गावासाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज होती. मात्र गावाला ८७४.२८ टीएमसी एवढाच पाणी उपलब्ध होत असल्याने २५८.३१ टीएमसी एवढ्या पाण्याचा तुटवडा निर्माण होत होता.
हा तुटवडा भरून काढण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फतीने शिवार फेरीअंतर्गत गाव परिसराचे निरीक्षण करून जलसंधारणाची काम केली. तीन जुन्या सिमेंट नाल्यांची दुरूस्ती, नाला खोलीकरण, ४८ बोड्यांची दुरूस्ती व ६१ नवीन विहिरी बांधल्या. त्यामुळे जलसंधारण वाढून २५८.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला व गावाची तसेच शेतीसाठी पाण्याची गरज सुद्धा पुरविण्यास मदत झाली.
पाणीटंचाईतून गावाची होणार मुक्ती
जैरामपूर गावात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नियोजनबद्ध कामे केली जात आहेत. यावर्षी आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
गावात जलसंधारणाची कामे करण्यास जैरामपूरचे सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाडे, प्रगतशील शेतकरी भाऊजी दिवसे, सुधाकर तोटपल्लीवार, गुरूदास आभारे, कृषी मित्र सुधाकर राऊत यांनी पुढाकार घेतला.
जैरामपूर गाव परिसरात सुमारे ८० बोड्या आहेत. यापैकी ६१ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. धानाला सिंचन उपलब्ध करून देण्यात या बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. दुरूस्तीमुळे बोड्यांची सिंचन क्षमता वाढली आहे. त्यामुळे या वर्षी धानपिकास शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.