मशागतीची लगबग वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:55 PM2019-06-01T23:55:16+5:302019-06-01T23:55:39+5:30
मृग नक्षत्र जवळ येताच शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग वाढली आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी वर्ग शेतात काम करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मृग नक्षत्र जवळ येताच शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग वाढली आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी वर्ग शेतात काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पेरणीची कामे केली जातात. त्यामुळे पेरणीपूर्वी करावयाच्या कामांना सवड मिळत नाही. त्यामुळे ही कामे पाऊस पडण्यापूर्वीच आटोपून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात होणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्राच्या शेवटच्या कालावधीत पेरणीच्या कामांना सुरूवात होते. त्यामुळे शेतकरी आताच खरीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारपर्यंत तापमान ४६ अंश सेल्सीअसवर पोहोचले होते. दुपारी १० वाजानंतर असह्य ऊन पडत होते. मात्र या उन्हाला न घाबरताही शेतकरी सकाळी ६ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत शेतात काम करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत होता.
प्रामुख्याने शेतातील कचरा काढणे, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरणे आदी कामांना सुरूवात झाली आहे. तर काही शेतकरी घरचे शेणखत शेतात नेऊन टाकत आहेत. पूर्वी सर्व कामे बैलबंडीच्या माध्यमातून शेतकरी स्वत: करीत होते. आता मात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने बरीच कामे केली जातात. त्यामुळे ही कामे लवकर आटोपण्यास मदत होत आहे. मात्र काही कामे मनुष्यबळाशिवाय करणे शक्य नसल्याने त्यासाठी मजूर लावले जात आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागानेही पुढाकार घेतला आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोणत्या पिकांची लागवड करावी, कोणते वाहन निवडावे, तसेच बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.