वृद्घ व बालकांची होतेय कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:31 PM2018-05-17T23:31:13+5:302018-05-17T23:31:13+5:30

गडचिरोली नगर परिषदेने शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकासासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र यात मुलांसाठी विरंगुळ्याची साधने, वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची तरतूद नाही. यावरून खुल्या जागांच्या विकासाचे योग्य नियोजन नगर परिषदेने केले नसल्याचे दिसून येत आहे.

Growth and inferiority of childhood | वृद्घ व बालकांची होतेय कुचंबणा

वृद्घ व बालकांची होतेय कुचंबणा

Next
ठळक मुद्देविरंगुळ्याच्या साधनांचा अभाव : शहरातील खुल्या जागांच्या विकासाचे नियोजनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेने शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकासासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र यात मुलांसाठी विरंगुळ्याची साधने, वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची तरतूद नाही. यावरून खुल्या जागांच्या विकासाचे योग्य नियोजन नगर परिषदेने केले नसल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली शहरात ४० पेक्षा अधिक ओपन स्पेस (खुल्या जागा) आहेत. यातील पाच ते सहा ओपन स्पेस सोडल्या तर इतर ठिकाणी कोणतेही बांधकाम झाले नव्हते. त्यामुळे त्या जागा डुकरांचे आश्रयस्थान बनले होते. याठिकाणी पावसाचे पाणी साचून राहात असल्याने पावसाळ्यात दुर्गंधी पसरत होती. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना होत होता. ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी होत असली तरी निधी नसल्याने विकास रखडला होता. २०१७-१८ मध्ये वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनंतर्गत राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर नगर परिषदेन ओपन स्पेसचा विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
राज्य शासनाने गडचिरोली नगर परिषदेला पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाच्या निविदा नगर परिषदेने काढल्या आहेत. या निविदेत संरक्षण भिंत बांधणे, लॉन तयार करणे, ट्रॅक बांधणे, पाणी देण्यासाठी पाईपलाईन बसविणे, तसेच दरावाजा लावणे याच कामांचा समावेश केला आहे. परिसरातील नागरिकांना व मुलांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध व्हावी हा मुख्य उद्देश ओपनस्पेस ठेवण्यामागे आहे. त्यामुळे या ठिकाणी मुलांना विरंगुळ्यासाठी विविध साधने लावणे, व वृद्घ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या लावणे आवश्यक होते. मात्र या साधनांचा निविदेत समावेश नाही. यावरून मुख्य उद्देशालाच या ठिकाणी हरताळ फासला असल्याचे दिसून येते.
खेळण्ी व खुर्च्या खरेदी करण्यासाठी स्वतंत्र निविदा काढावी लागते. बांधकामाच्या निविदेत त्याचा समावेश करता येत नाही असे नगर परिषद प्रशासनाचे म्हणने आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विरंगुळ्याची साधने खरेदी करून ती लावली जातील असे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र नगर परिषदेकडे निधीच राहत नसल्याने अनेक कामे रखडल्याचा अनुभव येथील नागरिकांना आहे.
याही बाबतीत असेच घडेल अशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे झालेले बांधकाम निरूपयोगी ठरेल. ओपन स्पेसवर बांधकामानंतर लगेच विरंगुळ्यासाठी साधने बसवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘ओपन स्पेस’चा होणार विकास
शहरातील अनेक खुल्या जागांचा विकास न.प.कडून करणार आहे. मात्र त्यात वृद्ध व बालकांसाठी कोणतेही नियोजन अद्याप केलेले नाही. विकसित होणाऱ्या जागांमध्ये आरमोरी मार्गावरील नरेश हेमके यांच्या घराजवळील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर कारमेल शाळेजवळील ओपन स्पेस, लांझेडा येथील समर्थ यांच्या घराजवळील जागा, डॉ.कामळी हॉस्पिटलजवळील डांगे यांच्या घरासमोरील जागा, चामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार यांच्या ले-आऊटमधील जागा, शाहू नगरातील तामसेटवार यांच्या घराजवळील जागा, गुहे यांच्या घराजवळील जागा, विसापूर मार्गावरील भोयर यांच्या घराजवळील जागा, मिल्ट्री कॅम्पलगत उईके यांच्या घराजवळची जागा, आयटीआय चौकातील नगर परिषद संकुलजवळच्या दोन खुल्या जागा, झाशी राणी नगरातील वर्षा बट्टे यांच्या घरासमोरची खुली जागा, जंगल कामगार सोसायटीजवळची खुली जागा, हेडगेवार चौैकातील महादेव मेश्राम, शिवाजी महाविद्यालयामागील खुली जागा, फाले व वाळके यांच्या घरामागील जागा, होंडा शो रूमजवळील खुली जागा, खांडरे व मुरस्कर यांच्या घराजवळील खुली जागा, कन्नमवार नगरातील मेश्राम यांच्या घराजवळील खुली जागा, मुख्याधिकारी निवासस्थानाजवळची जागा, चामोर्शी मार्गावरील पाराशर, म्हशाखेत्री यांच्या घराजवळील जागा, रामदास कायरकर यांच्या घराजवळची जागा, शिक्षक कॉलनीमधील काथवटे यांच्या घराजवळची जागा, पंचवटी नगरातील धाईत यांच्या घराजवळील जागेचा विकास करणार आहे.
खुल्या जागांवर खोदले वृक्ष लागवडीसाठी खड्डे
१३ कोटी वृृक्ष लागवडअंतर्गत गडचिरोली नगर परिषदेला यावर्षी ९०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. नगर परिषदेने एक हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ज्या ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी निविदा काढल्या आहेत त्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले आहेत. पावसाळा सुरू होताच सदर झाडे लावली जाणार आहेत. तर त्याचवेळी बांधकामालाही सुरूवात होणार आहेत. बांधकामामुळे झाडे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नियोजित संरक्षण भिंतीपासून काही अंतर सोडून झाडे लावली जाणार आहेत. त्यामुळे बांधकाम झाले तरी या झाडांना काहीही होणार नाही, अशी माहिती गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी लोकमतला दिली.

Web Title: Growth and inferiority of childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.