पीक विम्याच्या हप्त्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:33 PM2019-07-06T23:33:18+5:302019-07-06T23:33:52+5:30
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या हप्त्यात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यात धानाच्या पिकासाठी गेल्यावर्षीपेक्षा हेक्टरी ७८ रुपये, सोयाबीनसाठी १८ रुपये तर कापसाच्या पिकासाठी सर्वाधिक ४६९ रुपये हेक्टरी वाढ करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या हप्त्यात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यात धानाच्या पिकासाठी गेल्यावर्षीपेक्षा हेक्टरी ७८ रुपये, सोयाबीनसाठी १८ रुपये तर कापसाच्या पिकासाठी सर्वाधिक ४६९ रुपये हेक्टरी वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी धान उत्पादन चांगले झाल्याने विमा कंपनीकडून कोणालाही नुकसानभरपाई मिळाली नाही. मात्र १२९ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ७ लाख ७२ हजारांचा लाभ मिळाला होता.
यावर्षी पर्जन्यमानाची स्थिती पाहता पिक चांगले येईलच याची शाश्वती राहिलेली नाही. खरीप हंगामासाठी आवश्यक पाऊस अजूनही जिल्ह्यात झालेला नाही. अशा स्थितीत सर्व शेतकºयांनी २४ जुलैपूर्वी पीक विमा काढावा, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे.
जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता शासनामार्फत अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेड, मुंबई या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी धान पीकासाठी विम्याचा हप्ता हेक्टरी ५९७.५० रुपये होता. यावर्षी तो ६७५ रुपये असा झाला आहे. कापसासाठी गेल्यावर्षी १६८१.२५ रुपये असा हप्ता होता. तो यावर्षी २१५० रुपयांवर गेला आहे. सोयाबीनचा हप्ता ६४७.५० वरून ६६५ रुपये झाला आहे. या रकमेतून ७० टक्के जोखीम स्तर लागू राहणार आहे. जिल्ह्यात धान हे मुख्य पीक असले तरी दक्षिण भागात कापसाचे प्रमाण वाढले आहे. कमी पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या प्रतिकुल परिस्थितीत पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे भविष्यात शेतकºयांचे नुकसान होऊ शकते. जिल्ह्यात भात पिकाचा विमा उतरवण्यासाठी सर्व महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत. मात्र सोयाबिन पिकाकरीता अहेरी, पेरमिली, आलापल्ली, जिमलगट्टा, मुलेचरा, बामणी तर कापूस पिकाकरीता अहेरी, आलापल्ली, जिमलगटा, सिरोंचा, बामणी, पेंटीपाका, असरअल्ली या महसुल मंडळातील शेतकरी पात्र ठरणार आहेत.
कृषी कर्ज घेणाऱ्यांना विमा अनिवार्य
शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढावा अशी प्रशासनाची भूमिका असली तरी तो काढावा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे. मात्र कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्जासाठी अर्ज करतानाच विम्याचा अर्ज भरून घेऊन विम्याचा हप्ता कापला जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
या बाबींवरून निश्चित करतात नुकसानभरपाई
विमा संरक्षणाच्या बाबींमध्ये पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व झालेले नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसिर्गक आपत्ती इ.चा समावेश होतो. खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा व फळपिक योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतक-यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्याचा क्रमांक अर्जावर नमुद करावा लागणार आहे. गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरीता उपलब्ध करण्यात आले आहेत. या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून २४ जुलैपूर्वी अर्ज भरावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.