सुवर्ण खरेदीला जीएसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:25 PM2017-10-16T22:25:03+5:302017-10-16T22:25:22+5:30

गुढीपाडवा, अक्षयतृतीया, विजयादशमी, धनत्रयोदशी या सणांना साडेतीन मुहूर्ताचा मान आहे.

GST hit by gold purchase | सुवर्ण खरेदीला जीएसटीचा फटका

सुवर्ण खरेदीला जीएसटीचा फटका

Next
ठळक मुद्देधनत्रयोदशी विशेष : सणासुदीतील सराफा व्यवसाय आला निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गुढीपाडवा, अक्षयतृतीया, विजयादशमी, धनत्रयोदशी या सणांना साडेतीन मुहूर्ताचा मान आहे. आरोग्य, धनसंपदा व ऐश्वर्य लाभावे याकरिता साडेतीन मुहूर्तातील प्रत्येक सणाला सोना-चांदीचे दागिणे खरेदी करण्याची प्रथा वर्षानुवर्ष हिंदू धर्मात चालत आली आहे. या दिवशी खरेदी करणे ऐश्वर्यासाठी शुभ मानले जाते. परंतु यंदाच्या धनत्रयोदशीवर गुड्स अँड सर्विस टॅक्स अर्थात वस्तू व सेवा कराचा विपरित परिणाम झालेला आहे. या कराची अंमलबजावणी झाल्यापासून सराफांचा व्यवसाय निम्म्यावर आला आहे.
अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा आहेत. धनत्रयोदशीबद्दल एकदंत कथा अशीही आहे की, समुद्रमंथनप्रसंगी लक्ष्मी देवी प्रगट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर आला. म्हणून या दिवशी वैैद्यराज धन्वंतरीचीही पूजा केली जाते. धन्वंतरी यांच्या हातातील कमांडलू अमृताने भरलेला असतो, असेही म्हटले जाते. या दिवशी धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातील द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग व द्रव्यनिधी यांची पूजा करून नैैवेद्य देतात. ऐश्वर्य लाभावे, या उद्देशाने सोन्याचांदीची खरेदी या दिवशी होत असली तरी यंदा केंद्र शासनाने लागू केलेल्या वस्तू व सेवा कराचा फटका सराफा व्यावसायिकांना बसलेला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साडेतीन मुहूर्तांच्या सणाच्या दिवशी सोन्या- चांदीच्या दागिण्यांची खरेदी व्हायची. परंतु नवीन करामुळे सराफा व्यवसायावर परिणाम झाला आहे. अक्षयतृतीया, विजयादशमी या सणांंसह आता धनत्रयोदशीलाही जीएसटीचा फटका बसला आहे.
धनत्रयोदशीला अशी करतात पूजा
धनत्रयोदशी या सणाला देवांचा वैैद्य धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरीच्या हातात अमृतकुंभ असायचे. त्यामुळे या दिवशी कडूनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर लोकांना एकत्रित वाटले जाते. सायंकाळच्या सुमारास घर व परिसरात दिवे लावले जातात. विशेषत: संध्याकाळी तीळाच्या तेलाचे दिवे लावण्याची प्रथा काही भागात आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धनत्रयोदशीला कडू दुधी अथवा दोडक्याचे वेल आंघोळीचे पाणी गरम करण्याच्या माठावर अथवा भांड्यावर बांधले जाते.

दरवर्षी साडेतीन मुहूर्ताच्या सणांच्या दिवशी सोन्या-चांदीची ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचे. परंतु केंद्र शासनाच्या जीएसटी या नवीन करामुळे बाजारपेठेत निरूत्साह आहे. यंदाच्या धनत्रयोदशीला फटका बसला आहे.
- सुरेश भोजापुरे, सचिव, सराफा असोसिएशन, गडचिरोली.

Web Title: GST hit by gold purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.