पालकमंत्र्यांनी जाणली आरोग्य समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:22 AM2017-10-08T01:22:50+5:302017-10-08T01:23:02+5:30
वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा खिळखिळी बनल्याचे वृत्त माध्यमातून सातत्याने प्रकाशित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा खिळखिळी बनल्याचे वृत्त माध्यमातून सातत्याने प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेऊन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी एटापल्लीच्या रुग्णालयाला गुरूवारी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल शुंगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश हिरेकन, डॉ. नागोसे, भाजपचे एटापल्ली तालुकाध्यक्ष नवीन बाला, पंचायत समिती सदस्य जनार्धन नल्लावार, नगरसेवक विजय नल्लावार तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांनी या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची आस्थेने विचारपूस केली. दुर्गम भागातील रुग्णांना परिपूर्ण व योग्य आरोग्यसेवा देण्याचे काम येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी करावे, असे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.