दोन वर्षांपासून गडचिरोलीत राष्ट्रीय सणांकडे पालकमंत्र्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:42 AM2021-08-14T04:42:15+5:302021-08-14T04:42:15+5:30

गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात पालकमंत्र्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. राष्ट्रीय ...

Guardian Minister's visit to Gadchiroli National Festival for two years | दोन वर्षांपासून गडचिरोलीत राष्ट्रीय सणांकडे पालकमंत्र्यांची पाठ

दोन वर्षांपासून गडचिरोलीत राष्ट्रीय सणांकडे पालकमंत्र्यांची पाठ

googlenewsNext

गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात पालकमंत्र्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची पावले जिल्ह्याला हमखास लागत असतात; पण २६ जानेवारी २०१९ नंतर आलेल्या ५ राष्ट्रीय सणांपैकी एकाहीवेळी तिरंगा फडकविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उपलब्ध होऊ शकले नाही. गेल्या अडीच वर्षांत लाभलेल्या तीन पालकमंत्र्यांकडे दोन-दोन जिल्ह्यांची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ जिल्ह्याला प्राधान्य देत गडचिरोलीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

ज्या मंत्र्यांनी पालकत्व घेतले, त्यांची त्या जिल्ह्याशी भावनिक ‘अटॅचमेंट’ असल्याशिवाय तेथील समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविणे शक्य होत नाही. स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने झेंडा फडकविणे हे एक निमित्त असले, तरी त्यानिमित्ताने नागरिकांशी संवाद होतो, अधिकाऱ्यांशी चर्चा होते. यातून रखडलेली कामे मार्गी लागतात; पण पालकमंत्र्यांऐवजी दुसऱ्या मंत्र्यांचे येणे ही केवळ औपचारिकता ठरते. विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन आढावा घेत असले, तरी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या भेटी होत नसल्याने थोडा दुरावा जाणवत आहे.

(बॉक्स)

असे बदलले पालकमंत्री

२६ जानेवारी २०१९ ला तत्कालीन भाजप सरकारमधील पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झेंडा फडकविल्यानंतर काही दिवसांनी त्यांना मंत्रिपदावरून दूर व्हावे लागले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे काही महिन्यांपासून गडचिरोलीची जबाबदारी आली. १५ ऑगस्ट २०१९ ला मुनगंटीवार यांच्याऐवजी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी झेंडावंदन केले. त्यानंतर सरकार बदलले आणि गडचिरोलीचे पालकत्व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. त्यांनी २६ जानेवारी २०२० रोजी रोजगार हमी खात्याचे मंत्री संदीपान भुमरे यांना पाठविले. त्यानंतर कोरोनाकाळ सुरू झाल्याने संपर्क सुविधेसाठी काही दिवस पालकमंत्रीपद विजय वडेट्टीवार यांच्याकडे आले. त्यांनी दर आठवड्याला बैठका लावून कामांचा आढावा घेणे सुरू केले होते. पण शिवसेनेची जिल्ह्यावरील पकड कायम राहावी यासाठी पुन्हा शिंदे यांनी पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक राष्ट्रीय सणांना पालकमंत्र्यांऐवजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झेंडावंदन केले जात आहे.

(बॉक्स)

आर. आर. पाटील द्यायचे पूर्ण वेळ

२००९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले. केवळ औपचारिकता म्हणून नाही, तर राष्ट्रीय सणांना झेंडावंदन करण्यासाठी येताना ते दोन ते तीन दिवसांचे नियोजन करून येत असत. यानिमित्ताने अधिकाऱ्यांच्या बैठका आणि जिल्ह्यात दौरे करण्यावर ना. पाटील यांचा भर असायचा. जिल्ह्याच्या दक्षिण भागात झालेले काही मोठे पूल, गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालय अशा अनेक बाबी त्यांच्याच पुढाकाराने झाल्या आहेत. त्यामुळे आजही त्यांची आठवण या जिल्ह्यातील लोक करत असतात.

Web Title: Guardian Minister's visit to Gadchiroli National Festival for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.