अन् बंदूक चालविणारे हात पापड, लोणचं बनविण्यासाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:06+5:302021-07-24T04:22:06+5:30

गडचिरोली : गडचिरोलीच्या जंगलात मुक्तसंचार करत बिनधास्तपणे बंदूक चालविणाऱ्या, किंबहुना अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पूर्वाश्रमीच्या जहाल महिला नक्षली आता ...

The gun-wielding hands moved to make papad, pickles | अन् बंदूक चालविणारे हात पापड, लोणचं बनविण्यासाठी सरसावले

अन् बंदूक चालविणारे हात पापड, लोणचं बनविण्यासाठी सरसावले

Next

गडचिरोली : गडचिरोलीच्या जंगलात मुक्तसंचार करत बिनधास्तपणे बंदूक चालविणाऱ्या, किंबहुना अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पूर्वाश्रमीच्या जहाल महिला नक्षली आता चक्क पापड, लोणची, मसाला बनवून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करणार आहेत. ही किमया जिल्हा पोलीस दल आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने घडविली. आत्मसमर्पित महिला नक्षलींच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी आनंदाने ते पूर्णही केले. नक्षल चळवळीत महिलांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. अजाणत्या वयात त्या नक्षल चळवळीत गेल्या, पण सज्ञान झाल्यानंतर पदरी पडली ती केवळ निराशा. त्यामुळे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत नवजीवनाला सुरुवात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शस्र ठेवले. पोलिसांच्या निगराणीत त्यांच्यासाठी गडचिरोलीत स्वतंत्र वसाहतही उभारण्यात आली. त्यातील महिला नक्षलवाद्यांनी स्वयंपूर्ण व्हावे, स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी त्यांना विविध पदार्थ तयार करण्याचे दहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस विभागाच्या पुढाकाराने ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, आरसेटी गडचिरोली यांनी हे प्रशिक्षण दिले.

शुक्रवारी (दि.२३) या प्रशिक्षणाचा समारोप झाला. त्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), संस्थेचे संचालक चेतन वैद्य यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित महिला नक्षलींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले. या प्रशिक्षणासाठी आत्मसमर्पण कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे, सहकारी भय्याजी कुळसंगे, मधुकर रत्नम आदींनी परिश्रम घेतले.

(बॉक्स)

आयुष्यात कधीच पापड बनविले नव्हते

एकेकाळी बंदूक हाती घेऊन दहशत पसरविणाऱ्या महिला नक्षली आत्मसमर्पणानंतर सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यांना महिलांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये तसेच व्यवसायातील स्पर्धा यांची जाणीव प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून देण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच पापड, लोणचे बनविले नाही अशांनी स्वमर्जीने या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. केवळ वस्तू उत्पादन न करता त्याची बाजारात विक्री कशी करता येईल याचेही मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात आले.

Web Title: The gun-wielding hands moved to make papad, pickles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.