गुंडुरवाहीतील नागरिकांना मारहाण
By Admin | Published: May 24, 2016 01:37 AM2016-05-24T01:37:07+5:302016-05-24T01:37:07+5:30
कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलिसांनी गुंडुरवाही येथील नागरिकांना १८ मे रोजी मारहाण केली असून या प्रकरणाची चौकशी करावी,...
जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार : कोठी पोलिसांवर आरोप
भामरागड : कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलिसांनी गुंडुरवाही येथील नागरिकांना १८ मे रोजी मारहाण केली असून या प्रकरणाची चौकशी करावी, पोलिसांकडून होणारा अत्याचार थांबवावा, अशी मागणी गुंडुरवाही येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलीस जवान गुंडुरवाही गावात १८ मे रोजी सकाळी ५ वाजता आले होते. गावकऱ्यांना एकत्र बोलावून गावात नक्षलवादी आले आहेत का, अशी विचारणा केली. नंतर गावातील रहिवासी रानू रैनू लेकामी यांना गावातच बेदम मारहाण केली. त्यानंतर लालसू चुक्कू मट्टामी, देवू उलगे गोटा, मंगरू चुक्कू मट्टामी, पांडू इरगू कातवा, सोमा कुसू लेकामी, गुन्हा हिंगा लेकामी, डोक्के गुन्हा लेकामी, साधू डोक्के लेकामी, डोक्के लेकामी यांना पोलीस मदत केंद्र कोठी येथे घेऊन गेले. यापैकी रानू लेकामी, लालसू मट्टामी, देवू गोटा यांना पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण केली. नातेवाईक व इतर कुणालाही भेटू देत नाही. तिन्ही जणांच्या पत्नी, मुले भेटायला गेले असता, त्यांना तेथून हाकलून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या या अत्याचाराबाबतची चौकशी करायला लावून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सदर निवेदन सैनू लालू लेकामी, संजय पांडू कातव, चंदू पोदी तेलामी, रामजी मारा कोरसामी, रैनू झुरू लेकामी, जनी चिन्ना लेकामी यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
गुंडुरवाही येथील रानू लेकामी, लालसू मट्टामी, देवू गोटा हे नक्षल्यांच्या एरिया रक्षक दल, ग्रामरक्षक दलात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना मारहाण करण्यात आली नाही.
- संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली