गटार लाईनचा निधी संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:04+5:302021-03-08T04:34:04+5:30
शहरातून ८४ कि.मी.ची पाईपलाईन टाकण्याचे उद्दिष्ट हाेते. त्यापैकी ६० कि.मी.ची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. शहराच्या ९० टक्के भागात ...
शहरातून ८४ कि.मी.ची पाईपलाईन टाकण्याचे उद्दिष्ट हाेते. त्यापैकी ६० कि.मी.ची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. शहराच्या ९० टक्के भागात गटार लाईनचे काम पूर्ण झाले आहे. केवळ मुख्य लाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे तसेच बाेरमाळा घाटाकडे असलेल्या मलशुद्धिकरण केंद्राचे कामही काही प्रमाणात सुरू झाले आहे. शासनाने दिलेले व नगरपरिषदेच्या हिस्स्याचे असे एकूण २९ काेटी रुपये नगरपरिषदेकडे हाेते. हा संपूर्ण निधी कंत्राटदाराला देण्यात आला आहे. याेजनेच्या अंदाजपत्रकाचा विचार केल्यास पुन्हा ६० काेटी रुपयांची गरज आहे. विद्यमान शासनाने एकही रुपया या याेजनेसाठी दिला नाही. भविष्यात जर निधी प्राप्त झाला नाही तर काम रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
नगरपरिषदेमार्फत निधीसाठी पाठपुरावा
पुढचा निधी प्राप्त न झाल्यास काम रखडण्याची शक्यता असल्याने नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे पत्र पाठवून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, मंत्रालय स्तरावर राजकारणाचे वजन ठेवल्याशिवाय निधी उपलब्ध हाेत नाही. जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी तसेच पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा गटार लाईनचे काम रखडण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यांची लागली वाट
शहराच्या बहुतांश भागात सिमेंट काँक्रीटीकरण व डांबराचे रस्ते बनले हाेते. गटार लाईनचे काम करताना या सर्व रस्त्यांची ताेडफाेड करण्यात आली. गटार लाईनच्या कंत्राटदाराने केवळ मलमपट्टी लावण्याचे काम केेले आहे. काही ठिकाणी जवळपास १० फूट खाेलावर पाईप टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी रस्ता दुरूस्त केला. मात्र, तेथे खाेलगट भाग पडण्यास सुरूवात झाली आहे. काही रस्त्यांवर माती अस्ताव्यस्त पसरून आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशाही स्थितीत शहरातील नागरिक शांत आहेत. मात्र, काम ठप्प पडल्यास नागरिकांचा संताप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.