शिक्षकांनो, रूजू व्हा! अन्यथा कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:45 PM2018-08-19T23:45:41+5:302018-08-19T23:46:38+5:30

आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, .........

Guys, come on! Otherwise the action will be taken | शिक्षकांनो, रूजू व्हा! अन्यथा कारवाई होणार

शिक्षकांनो, रूजू व्हा! अन्यथा कारवाई होणार

Next
ठळक मुद्देसीईओंच्या परिपत्रकानंतर शिक्षकांमध्ये खळबळ : इच्छित शाळा न मिळाल्याने शिक्षक वैद्यकीय रजेवर

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी १६ आॅगस्ट रोजी काढले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक शाळा नक्षलग्रस्त, आदिवासी बहूल व जंगल भागात आहेत. काही गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. नदी, नाले पार करून शाळेत जावे लागते. तर काही गावांचे अंतर तालुकास्थळापासून १०० ते १२० किमी असल्याने तालुकास्थळी राहून अपडाऊन करणेही शक्य होत नाही. एवढेच नाही तर अहेरी, एटापल्ली तालुक्यातील काही शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये भाड्याचे घर करून राहावे लागते. गडचिरोली जिल्ह्यातील या भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक कर्तव्य बजावण्यास तयार होत नाही.
शिक्षकांच्या यावर्षी आॅनलाईन बदल्या झाल्या. आजपर्यंत शहराजवळ राहून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सरळ सीमावर्ती भागांमध्ये नियुक्ती देण्यात आली. तर काही शिक्षकांवर आॅनलाईन बदलीमध्ये अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त तसेच दुर्गम भागात कर्तव्य बजावण्याची इच्छा नसलेल्या काही शिक्षकांनी वैद्यकीय रजेचा पर्याय अवलंबला आहे.
आधीच गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दोन शिक्षकी शाळांमध्ये एका शिक्षकाची नियुक्ती करून शाळा चालविली जात आहे. एका शिक्षकाला प्रशासकीय कामे, चार वर्गांना अध्यापन करावे लागत आहे. एखादे दिवशी प्रशासकीय काम आल्यास शाळा बंद ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा स्थितीत इच्छित शाळा न मिळाल्याचे कारण पुढे करून काही शिक्षकांनी वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची आणखी टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत कर्तव्याच्या ठिकाणी रूजू व्हावे. सात दिवसांमध्ये जे शिक्षक कर्तव्यस्थळी रूजू होणार नाहीत, त्यानंतर त्यांना गट शिक्षणाधिकाºयांनी परस्पर रूजू करून न घेता वैद्यकीय मंडळाकडे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता निर्देशीत करावे. आजारी नसल्याचे सिध्द झाल्यास तसेच खोट्या कारणावरून रजेवर गेल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा परिपत्रकातून दिला आहे. या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.
गट शिक्षणाधिकाऱ्यांनाही इशारा
सात दिवसांच्या आत जे शिक्षक स्वत:हून कर्तव्यावर रूजू होणार नाहीत, अशा शिक्षकांना नंतर गट शिक्षणाधिकारी यांनी रूजू करून घेऊ नये. संबंधित शिक्षकांना वैद्यकीय मंडळाकडेच पाठवावे. त्यांना वैद्यकीय मंडळाकडे हजर न केल्यास पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाºयांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे गट शिक्षणाधिकाºयांनी संबंधित शिक्षकांना फोन करून याबाबतची माहिती दिली जात आहे.

Web Title: Guys, come on! Otherwise the action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.