निवासस्थाने धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:50+5:302021-06-10T04:24:50+5:30
अहेरी : येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता २५ वर्षांपूर्वी निवासस्थानांसाठी इमारत बांधण्यात आली. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी तसेच निकृष्ट बांधकामामुळे ...
अहेरी : येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता २५ वर्षांपूर्वी निवासस्थानांसाठी इमारत बांधण्यात आली. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी तसेच निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
विहिरीचे अनुदान मिळेना
वैरागड : शासनाच्या धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत आरमोरी व कुरखेडा तालुक्यांत अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र, संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
ब्लड बँकेअभावी रुग्णांची अडचण
सिरोंचा : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दोन रक्तपेढ्या आहेत. याशिवाय अन्य ठिकाणी रक्तपेढ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे रक्ताची गरज भासलेल्या रुग्णाला दोन ठिकाणी भरती करावे लागते.
पुलावरील संरक्षक कठडे गायब
वैरागड : वैरागड-करपडाच्या मधोमध वाहणाऱ्या खोब्रागडी नदी पुलावर लोखंडी संरक्षक कठडे लावण्यात आले होते; परंतु दोन वर्षांतच येथील कठडे अज्ञात लोकांनी लांबविल्याने पूल संरक्षक कठड्यांशिवाय जैसे थे झाला आहे.
पक्क्या रस्त्याअभावी ४० किमींची पायपीट
लाहेरी : बिनागुंडा परिसरात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना चिखल तुडवत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व उपचारासाठी लाहेरी येथे यावे लागते. पक्का रस्ता नसल्याने अनेक नागरिक ३५ ते ४० किमी पायी चालत येतात.
रेगुंठात फोर-जी सेवा द्या
सिरोंचा: तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने, ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएलचे टॉवर उभारून फोर-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापुरी बंधारे जीर्ण
धानोरा : सिंचन विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.
इमारतीची दुरवस्था
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मागील १० वर्षांपासून या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या ही इमारत बेवारस आहे.
शेतीसाठी झुडपी जंगल द्या
गडचिरोली : काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. हे जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही. शेती तोट्याचा व्यवसाय ठरत आहे.
तंमुसला प्रशिक्षण द्या
रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे साेडविण्यास मदत हाेईल.
मच्छरदानी पुरवा
अंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा, आसरअल्ली परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे. साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी या भागात प्रशासनाने डास प्रतिबंधक फवारणी करून नागरिकांना मच्छरदानीचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.
अपुरा पाणीपुरवठा
गडचिरोली : नगर पालिकेच्या वतीने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी शहराच्या गोकुलनगरलगतची वाढीव वस्ती, माता मंदिर मागील व सभोवतालच्या परिसरात केवळ २० ते २५ मिनिटे नळाला पाणी येत असून, या भागात एकदाच सायंकाळी नळाला पाणी सोडले जाते.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. जिल्ह्यात दुग्ध याेजना राबवावी.
डुकरांचा बंदाेबस्त करा
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा धुमाकूळ प्रचंड वाढला आहे. पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्तासाठी काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम सध्या थंडावल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाचे मोकाट डुकरांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
जीर्ण खांब बदला
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले असून, कधीही कोसळण्याचा धोका आहे. जीर्ण खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र राेष व्यक्त हाेत आहे.
निवारा शेडचा अभाव
जाेगीसाखरा : तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावांत पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळा तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अतिक्रमण वाढले
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे.