शेतात रानडुकरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:11 PM2018-02-05T23:11:49+5:302018-02-05T23:12:10+5:30
आॅनलाईन लोकमत
चामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प्यात असताना रानडुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे विदारक चित्र चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरासह संपूर्ण चामोर्शी तालुका व जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत आहे.
यंदाच्या रबी हंगामात भेंडाळा, मोहुर्ली, कान्होली, फराडा, मार्र्कंडादेव आदींसह लगतच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल तसेच भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. अत्यंत विपरित परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करून मशागत केली. पेरणी झाल्यानंतर आता रबी हंगामातील ही पिके शेतकऱ्यांच्या हाती येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हरभरा व तूर पूर्णत: भरले असून येत्या काही दिवसांत हरभराच्या खोदणीच्या कामास सुरूवात होणार आहे. नेमक्या अशाच वेळी भेंडाळा परिसरातील शेतामध्ये रानडुकरे प्रवेश करून हैदोस घालीत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ही पिके रानडुकरांनी उद्ध्वस्त केली आहेत. मात्र रानडुकराच्या बंदोबस्तासंदर्भात वन विभागाचे अधिकारी गंभीर नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या संदर्भात महसूल, कृषी व वन विभागाने संयुक्तरित्या धडक मोहीम राबवून रबी हंगामातील नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, अशी मागणी भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना साकडे
भेंडाळा येथील प्रभाकर डांगे यांनी आपल्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हरभरा पूर्णत: भरलेला असताना रानडुकरांनी शेतात धूडघूस घालून हे पीक नष्ट केले. त्यामुळे मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी डांगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी चामोर्शीच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.