धानोरा व कुरखेडा तालुक्यात गारपीट
By admin | Published: March 15, 2016 03:20 AM2016-03-15T03:20:10+5:302016-03-15T03:20:10+5:30
सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारपीट झाली. यामुळे कुरखेडा, धानोरा व भामरागड या
गडचिरोली : सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारपीट झाली. यामुळे कुरखेडा, धानोरा व भामरागड या तालुक्यामधील भाजीपाला तसेच उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अचानक सुरू झालेल्या गारपीटीमुळे नागरिकांचीही धांदल उडाली.
कुरखेडापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी, कोटलडोह परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास जवळपास अर्धा तास वादळवारा, पाऊस यांच्यासह गारपीट झाली. रस्ते तसेच घरांच्या स्लॅबवर गारांचा खच पडला होता. या परिसरात उन्हाळी हंगामात मका, मिरची यांचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर रबी हंगामाची पिकेही तोडून आहेत. मळणीचे काम सुरू झाले आहे. अशातच अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
धानोरा तालुक्यातही सोमवारी दुपारच्या सुमारास वादाळासह गारपीट झाली. अचानक सुरू झालेल्या गारपीटीमुळे नागरिकांची फार मोठी धांदल उडाली. वादाळामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक खंडीत झाली होती. धानोरा तालुक्यातही गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल विभागाने पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता आणखी पावसाला सुरूवात झाली आहे. भामरागड तालुक्यातही मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट झाली. विद्युत पुरवठाही खंडीत झाला.
सोमवारी रात्री गडचिरोली येथे १२.४ मिमी, धानोरा १४.३०, मुरूमगाव ६.२, चातगाव ५.६, कढोली येथे ४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)