जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:00 AM2021-12-30T05:00:00+5:302021-12-30T05:00:21+5:30

कोरची शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने रस्ताही पाण्याखाली गेला होता. सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पूर्ण रात्र कोरचीकरांनी अंधारात काढली. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ते ६ मध्ये जंगलातून आलेल्या वानरांनी धुमाकूळ सुरू केला आहे. त्यांच्या उड्या मारण्याने नागरिकांच्या घराच्या छतावरील कौले फुटली.

Hailstorms and unseasonal rains in the district | जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा कहर

जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा कहर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या अनेक भागांत मंगळवारच्या रात्री आणि बुधवारच्या पहाटे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यातच दुपारी चामोर्शी, कोरची तालुक्यासह इतर काही भागात गारपीटही झाली. याचा फटका रब्बी पिकांसह खरिपातील उघड्यावर असलेल्या धानाला बसला आहे. कोरची तालुक्यात वीज पडून बैल ठार झाला. गारपीट आणि पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला आहे.
गडचिरोली शहरात मंगळवारी (दि. २८) रात्री पावसाचा एक ठोक येऊन गेल्यानंतर रात्री बराच वेळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतर पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. दिवसभर ढगाळ वातावरणासह गारवा पसरला होता. दुपारी गडचिरोली शहराच्या सर्वोदय वॉर्डात आलेल्या १५ ते २० वानरांच्या टोळीने अनेक घरांवर धुमाकूळ घातला. घराच्या आवारात असलेल्या पेरूच्या झाडांवर उड्या मारत पेरूवर ताव मारत ही टोळी निघून गेली.

कोरची तालुक्यात अनेक घरांचे नुकसान

कोरची : येथे मंगळवारी सायंकाळी २० ते २५ वानरांनी धुमाकूळ घालत अनेकांच्या घरांची कौले फोडली. त्यानंतर अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक घरांना गळती लागली होती. मंगळवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोरची शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने रस्ताही पाण्याखाली गेला होता. सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पूर्ण रात्र कोरचीकरांनी अंधारात काढली. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ते ६ मध्ये जंगलातून आलेल्या वानरांनी धुमाकूळ सुरू केला आहे. त्यांच्या उड्या मारण्याने नागरिकांच्या घराच्या छतावरील कौले फुटली. नागरी वस्तीमधील वालाच्या शेंगा, चवळीच्या सेंगा, तूर, लाखोळी आणि विशेष करून पेरूच्या झाडांवर पेरू खाण्यासाठी वानरांचा प्रयत्न सुरू होता. वानरांच्या धुमाकुळानंतर रात्रभर अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे घरांमध्ये पाणी गळती सुरू झाली. हे कमी होते म्हणून की काय, बुधवारी दुपारी गारपीटही झाली. त्यामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळी पुन्हा वानरांनी शहरात हजेरी लावली. यावेळीही त्यांनी रात्रभर ओल्या झालेल्या कवेलूंचे नुकसान केले. वानरांच्या धाकामुळे अनेक लोकांनी घराच्या आवारातील पेरूची झाडे कापायला सुरुवात केली आहे.

रब्बी पिकांची हानी

वैरागड : मागील तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऐन बहरात असलेले कमी मुदतीचे तूर पीक पिवळे पडू लागले आहे. आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. भुईमुगाचे पीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. अशातच जोरदार पाऊस झाल्याने शेंगांना कोंब फुटून भुईमुगाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

देसाईगंज तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसान

-    देसाईगंज तालुक्यात मंगळवारच्या रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कमी पावसावर पिकणारे रब्बी कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या बांध्यात लाख, लाखोळी, हरभरा, तूर, वाटाणा, मूग पिके आहेत. पावसाच्या सरीवर सरी आल्याने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह इतर पिके खराब होण्याची शक्यता आहे. तालुक्यात जवळपास २०० ते ३०० हेक्टरमध्ये कारल्याची लागवड झाली आहे. सर्व वेलवर्गीय पिकेही धोक्यात आली आहेत. मातीपासून बनविलेल्या कच्च्या विटाही पाण्यात मुरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.
-    अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह व्यावसायिकांची दाणादाण उडविली आहे. बुधवारला गडचिराेली जिल्ह्यात आठवडी बाजार भरला हाेता. पावसाने अनेक विक्रेत्यांचे नुकसान झाले. 

 

Web Title: Hailstorms and unseasonal rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस