हत्तीकॅम्पमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:46 AM2018-11-12T00:46:22+5:302018-11-12T00:47:08+5:30
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते.
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत. जंगलातील लाकडे आणण्यासाठी या हत्तींचा वापर केला जात होता. मात्र वाहने वाढल्याने हत्तींचे काम आता संपल्यागत आहे, असा निष्कर्ष काढून वनविभागाने येथील हत्तींचे दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हाभरातून याला विरोध झाल्यानंतर हत्तीचे स्थानांतरण थांबले.
हत्ती हा अतिशय मोठा व जंगली प्राणी असल्याने या प्राण्याला पाहण्याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीला राहते. गडचिरोली जिल्ह्यात एकमेव कमलापूर येथेच हत्ती उपलब्ध आहेत. वर्षभर या ठिकाणी पर्यटक येत राहतात. मात्र दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पर्यटक व प्राणीप्रेमींची संख्या वाढते. यावर्षीच्या दिवाळीतही कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. हत्तीसोबत माऊथ व इतर वनविभागाचे कर्मचारी राहत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहते. त्यामुळे पर्यटक हत्तीजवळून हत्तीला पाहू शकतात. त्याचबरोबर काही पर्यटक हत्तीजवळ जाऊन स्वत:ची सेल्फी काढण्याचाही आनंद लूटत आहेत.
हत्ती कॅम्पला लागूनच तलाव आहेत. सदर तलावाच्या चारही बाजूला जंगल आहे. त्यामुळे हे निसर्गरम्य स्थळ आहे. तलावात बोटींगची व्यवस्था झाल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. मात्र शासनाचे व वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा, मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटनाला व्यवसायाचे रूप देता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.