हलबा समाजाची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:35 PM2017-11-18T23:35:53+5:302017-11-18T23:36:09+5:30
हलबा समाजाला अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी हलबा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : हलबा समाजाला अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी हलबा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चाच्यापूर्वी इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. हलबा समाजाला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४२ नुसार आरक्षण दिले आहे. मात्र राज्य व केंद्र शासन मागील २५ वर्षांपासून आरक्षणाचा लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे. आरक्षण हा हलबा समाजाचा हक्क असून या हक्कासाठी संवैधानिक मार्गाने आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज राहावे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व अनुसूचित जाती कल्याण समिती सदस्यांना निवेदन दिले. हलबा समाजाची मागणी रास्त असून केंद्र व राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
मोर्चाचे नेतृत्व आमदार विकास कुंभारे, उदय धकाते, डॉ. शिवनाथ कुंभारे, धनंजय धार्मिक, छायाताई कुंभारे, संजय निखारे, वामदेव सोनकुसरे, शरद सोनकसुरे, अनिल धकाते यांनी केले. मोर्चात महादेव कुंभारे, रमेश निखारे, हरिदास कुंभारे, सुरज कवाडघरे, सूचिता धकाते, कुंदा निखारे, ममता धकाते, निलिमा तळोदीकर, शिला सोरते, पुष्पा नंदनवार, वैशाली धकाते, प्रशांत नंदनवार, अशोक धकाते, रूपराम निमजे, विनोद धकाते, भाष्कर बोकडे, भरत निमजे, सिंधू धकाते, विजय हेडाऊ, आनंदराव सोनकुसरे, आरती बोकडे यांच्यासह शेकडो हलबा आदिवासी जमातीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सभेचे संचालन शिवानंद सहारकर यांनी केले.
या मोर्चात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.