अर्धा एकर मत्स्य शेतीतून घेतले लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:10 AM2019-06-16T00:10:44+5:302019-06-16T00:11:17+5:30
जगभरातून आता सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती व सेंद्रीय दुध आदी खाद्य पदार्थांना मागणी वाढत आहे. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपुरक शेती पध्दती पुढे येत आहे.
विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : जगभरातून आता सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती व सेंद्रीय दुध आदी खाद्य पदार्थांना मागणी वाढत आहे. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपुरक शेती पध्दती पुढे येत आहे. देसाईगंज तालुक्याच्या नैनपूर येथील गजेंद्र महादेव ठाकरे व उमेश्चंद्र अण्णाजी तुपट या शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरत अर्धा एकर शेतीत धान पिकात मत्स्य शेती हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला. या मत्स्य शेतीतून लाखाचे उत्पन्न या शेतकºयांनी मिळविले.
अर्धा एकर शेतीत या दोन्ही शेतकºयांनी खरीप हंगामात धान व रबी हंगामात सेंद्रीय मका पिकाचे उत्पादन घेतले. याशिवाय ११ महिने कालावधीचे मत्स्य पिकही घेतले. दोन्ही हंगामातील धान व मका पिकापासून या शेतकºयांना २६ हजार ४०० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
धान पिकातील मत्स्य शेतीतून ११ महिन्यानंतर ५३० किलो ग्रॅम मासोळ्यांपासून १६० रुपये प्रती किलो ग्रॅम प्रमाणे ८४ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या मासोळ्याचे वजन ८०० ग्रॅम ते एक किलो ग्रॅम झाले असून अर्धा एकरात १ हजार २०० ते १ हजार ३०० नग मासोळ्या आहेत.
त्यामुळे जवळपास अर्धा एकर शेतीतून धान, मका व मत्स्य शेतीतून एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचे उत्पन्न आतापर्यंत मिळविले आहे.
असा केला प्रयोग
धान शेतीत मत्स्य शेती करताना सदर शेतकºयांनी आपल्या शेतीत चारही बाजुला चौकोनी आकारात दीड मीटर खोल खड्डा तयार केला. या खड्ड्यात रोहू, कतला, शिप्रस या जातीच्या मासोळ्यांचे बीज सोडले. उरलेल्या मध्यभागी खुल्या जागेत धानाची रोवणी व मक्का असे दोन पीक घेतले. ११ महिन्यानंतर मासोळ्या विक्रीयोग्य झाल्या. यातून उत्पन्न मिळाले.
सुरूवातीला अर्धा एकर शेतीतून मला २० हजार रुपयांचेही उत्पन्न प्राप्त होत नव्हते. परंतु सेंद्रीय धान पिकात मत्स्य शेती केल्यामुळे अर्ध्या एकर शेतीतून लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
- गजेंद्र ठाकरे, शेतकरी, नैनपूर
सेंद्रीय शेतीतील मिश्र उत्पादन पध्दतीमुळे शेतकºयांचे उत्पन्न दुपट होण्यास निश्चितच मदत होते.
- महेंद्र दोनाडकर, तंत्रव्यवस्थापक, देसाईगंज