अर्ध्याअधिक एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:08 AM2017-12-26T00:08:36+5:302017-12-26T00:09:26+5:30

ग्राहकांना पैसे काढण्याची अविरत सेवा मिळण्याबरोबरच बँकांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक बँकेने ठिकठिकाणी ‘एटीएम’ ची सोय केली आहे. या एटीएममध्ये लाखो रूपयांची रोकड ठेवली जाते.

Half of the ATM security in the wind | अर्ध्याअधिक एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

अर्ध्याअधिक एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांची कमतरता : राराष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममधील रक्कम असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्राहकांना पैसे काढण्याची अविरत सेवा मिळण्याबरोबरच बँकांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक बँकेने ठिकठिकाणी ‘एटीएम’ ची सोय केली आहे. या एटीएममध्ये लाखो रूपयांची रोकड ठेवली जाते. मात्र एटीएमच्या सुरक्षेसाठी निम्म्याहून अधिक बँकांनी सुरक्षा रक्षकच नेमला नसल्याचे धक्कादायक वास्तव लोकमत प्रतिनिधीने गडचिरोली शहरात सोमवारी दुपारी २ ते ४ वाजताच्यादरम्यान केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान दिसून आले.

बँकांच्या एटीएममध्ये लाखो रूपयांची रक्कम राहात असल्याने त्या रकमेच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरक्षा रक्षक नेमून एटीएम व त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना केली आहे. पैशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण मानला जात असला तरी राष्ट्रीयकृत बँका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. बऱ्याचदा सुरक्षेचा खर्च वाचविण्यासाठी बँका सुरक्षा रक्षक नेमत नाही. याचा गैरफायदा घेत चोरटे एटीएम फोडून रोकड लंपास करीत असल्याच्या घटना जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यानुसार ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे सर्व बँकांनी एटीएमच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात बहुतांश बँका याबाबत चांगल्याच बेफिकीर असल्याचे दिसून येते.
गडचिरोली शहरात विविध बँकांचे जवळपास २० एटीएम आहेत. या एटीएममध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणती उपाययोजना बँकांनी केली आहे याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने लोकमत प्रतिनिधीने सोमवारी दुपारी शहरातील एटीएमची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शहरातील एकूण एटीएमपैकी निम्म्याहून अधिक एटीएममध्ये सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून आले आहे. विशेष करून ज्या बँकांचे एटीएम बँकेच्या परिसरात आहेत अशा बँका दिवसभरासाठी एकही सुरक्षा रक्षक ठेवत नसल्याचे दिसून आले आहे. रात्रीसाठीच एखादा सुरक्षा रक्षक नेमून काम चालविले जात आहे. यामुळे दिवसाढवळ्या एखाद्याला लुटण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरक्षा रक्षक न आढळलेल्या बँकांमध्ये प्रामुख्याने स्टेट बँक आॅफ इंडिया, विजया बँक, युनियन बँक या बँकांचा समावेश होता. प्रत्येक बँकांनी एटीएम खोलीच्या बाहेर व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे दिसून आले. काही बँकांनी तर एकाच एटीएममध्ये चारपेक्षा जास्त सीसीटीव्ही लावले आहेत. यावरून सीसीटीव्हीबाबत बँका संवेदनशील असल्याचे दिसून येते.
तोकड्या पगारावर मोठ्या रकमेच्या सुरक्षेची जबाबदारी
एटीएमची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी बँकांकडून सुरक्षा एजन्सीला कंत्राट दिला जातो. या एजन्सींकडून लाखो रुपयांच्या रकमेची सुरक्षा पाहणाºया सुरक्षा रक्षकाला केवळ तीन ते सहा हजार रूपये यादरम्यान मानधन दिले जाते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जवळपास ४० सुरक्षा रक्षक आहेत. या सुरक्षा रक्षकांना केवळ ३ हजार ६०० रूपये मानधन दिले जाते. काही राष्ट्रीयकृत बँकांच्या सुरक्षा रक्षकांना पाच ते सहा हजार रूपयांदरम्यान मानधन मिळते. एवढ्या तुटपुंज्या मानधनात १२ तासांची सेवा द्यावी लागते.
पीएफची रक्कम कापली जात असल्याचे सेक्युरिटी एजन्सी मालकाकडून सांगण्यात येत असले तरी आपला पीएफ नंबर काय, किती रक्कम जमा होत आहे, याबाबत सुरक्षा रक्षक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. कमी वेतनात जास्त काम हा कटू अनुभव लक्षात आल्यानंतर ते नोकरी सोडत असल्याचीही माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली.
सुरक्षा रक्षक रात्रीच्या सुमारासही एटीएममध्येच राहतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी कोणतीही सुविधा एटीएममध्ये नाही. एसी बंद असल्यास घाम गाळतच बसावे लागते. पंखा नसल्याने रात्री डासांचेही भक्ष्य बनावे लागते.
दारे तुटली, एसी बंद
लोकमतच्या या स्टिंग आॅपरेशनदरम्यान बहुतांश एटीएमची दारे तुटली असल्याचे दिसून आले. एटीएम मशीन व्यवस्थित चालण्यासाठी एसी आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक एटीएममध्ये एसी लावले आहेत. त्यापैकी निम्मे एसी बंद असल्याचे दिसून आले. एसी बंद असल्याने एटीएम मशीन व्यवस्थित काम करीत नाही. सुरक्षा रक्षकालाही घाम गाळत बसावे लागते.
एका रक्षकाकडे १२ तासांची ड्युटी
कामगार कायद्यानुसार कोणत्याही कामगाराकडून आठ तासापेक्षा जास्त तास काम करवून घेता येत नाही. मात्र बहुतांश राष्टÑीयकृत बँकांनी केवळ दोनच सुरक्षा रक्षक नेमले असून प्रत्येकाला १२ तास ड्युटी करावी लागत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे त्या रक्षकांना साप्ताहिक सुटीसुध्दा दिली जात नाही. एखाद्या दिवशी सुटी घेतल्यास त्यांचे मानधन कपात केले जाते. एखादा रक्षक सुटीवर गेला तर दुसºया सुरक्षा रक्षकाला २४ तास काम करावे लागते. कामगार कायद्यानुसार २४ तास सेवा द्यायची असेल तर तीन कामगार नेमने आवश्यक असताना बँका केवळ दोनच कामगार नेमत आहेत. यावरून बँका कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसून येते. केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये २४ तासासाठी तीन सुरक्षा रक्षक असल्याचे आढळले.
धानोरातील एटीएम सदैव कॅशलेस
धानोरा येथे स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. मात्र या एटीएममध्ये अपवाद वगळता कधीच रोकड राहात नाही. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेल्या बहुतांश बँक ग्राहकांना आल्यापावली रिकाम्या हाताने परत जावे लागते. एटीएममध्ये रोकड ठेवण्याबाबत ग्राहकांनी अनेकवेळा बँक प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र बँक प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. एटीएममधील एसी बंद आहे. एकच सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे.

Web Title: Half of the ATM security in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम