४५ वर्षांपासून अर्धवट राहिलेला पूल; वैनगंगेत लाखो रुपयांवर फिरते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:39 AM2020-02-19T10:39:57+5:302020-02-19T10:40:16+5:30
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा व मार्कंडादेवाच्या मंदिराकडे जाणारा पुलाचे बांधकाम गेल्या ४५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत राहिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा व मार्कंडादेवाच्या मंदिराकडे जाणारा पुलाचे बांधकाम गेल्या ४५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत राहिले आहे. या पुलाच्या डागडुजीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र पावसाळ््याआधी केलेली तात्पुरती डागडुजी पावसात वाहून जाते व लाखो रुपयांवर पाणी फेरले जाते अशी येथील स्थिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे, अतिप्राचीन हेमाडपंथी शैलीतले मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी वैनगंगेचे भलेथोरले पात्र आहे. याच पात्रात ४५ वर्षांपूर्वी एका पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले होते. लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या यात्रेला येण्यासाठी या पुलाचा वापर करतात. पावसाळ््यात यावर रेतीच्या चुगड्या टाकून तात्पुरता बांध घातला जातो. मात्र तो अतिवृष्टी वा पुरात वाहून जातो. दरवर्षी शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात जातात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे आजपावेतो कानाडोळा केलेला आहे. याच आठवड्यात असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त या पुलावरून लाखो भाविक येणार आहेत. या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.