अर्ध्या बसस्थानकाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:20+5:30
गडचिरोली हे जिल्हास्थळ असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या गडचिरोली बसस्थानकावर येतात. तसेच जिल्हाभरातही अनेक बसगाड्या गडचिरोली येथून सोडल्या जातात. त्यामुळे गडचिरोली बसस्थानकावर प्रवाशांची व बसगाड्यांची नेहमीच गर्दी राहते. पुरेशा जागेअभावी प्रवाशांची अडचण वाढली होती. बसस्थानकाची इमारत जुनी व लहान होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर गडचिरोली येथील बसस्थानकाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. सदर बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर उर्वरित बसस्थानकाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असल्याने सदर जागा टीन टाकून बंद करण्यात आली आहे.
गडचिरोली हे जिल्हास्थळ असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या गडचिरोली बसस्थानकावर येतात. तसेच जिल्हाभरातही अनेक बसगाड्या गडचिरोली येथून सोडल्या जातात. त्यामुळे गडचिरोली बसस्थानकावर प्रवाशांची व बसगाड्यांची नेहमीच गर्दी राहते. पुरेशा जागेअभावी प्रवाशांची अडचण वाढली होती. बसस्थानकाची इमारत जुनी व लहान होती. या सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. बसस्थानकाचे नूतनीकरण व विस्तार करण्याच्या कामाला दीड वर्षापूर्वी सुरूवात झाली. मात्र काम अतिशय संथगतीने झाल्याने दीड वर्षाच्या कालावधीत केवळ अर्धेच काम पूर्ण झाले. ज्या ठिकाणी काम झाले तो बसस्थानकाचा परिसर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे तर उर्वरित अर्ध्या जागेवर बांधकाम सुरू आहे.
समोरच्या बाजूने कंत्राटदाराने टीन लावून ही जागा बंद केली आहे. समोरच्या भागात मोठ्या प्रमाणात रेती डम्पिंग करून ठेवली आहे. नवीन बसस्थानकाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. अर्धे काम करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला तर उर्वरित काम करण्यासाठी आणखी किती दिवस लागेल, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकाचे विस्तारिकरण करताना जुन्या इमारतीला जोडून नवीन फलाट बांधले आहे. तसेच शौचालय व इतरही सोयीसुविधा तयार करून द्यायच्या आहेत. या सर्वांचा विचार केल्यास पुन्हा अर्ध्यापेक्षा अधिक बांधकाम शिल्लक आहे. नवीन बांधकामात बसस्थानकाची सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. कामाची गती वाढवून उर्वरित काम लवकर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.