अर्धवट विंिहरी ठरल्या निरूपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:27 PM2018-04-12T22:27:24+5:302018-04-12T22:27:24+5:30
एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
एटापल्ली तालुक्यात लाखो रूपये खर्चून रोहयो अंतर्गत विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र गट्टा परिसरातील काही गावांमधील विहिरी अपूर्ण आहेत. काही विहिरींचे बांधकाम अगदी तोंडीपर्यंत पोहोचले आहे. एटापल्ली तालुक्यात पाण्याची पातळी चांगली असल्याने या सर्वच विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र विहिरींवर व्यस्थित तोंडी बांधण्यात आली नाही. तोंडीवर पाणी काढण्यासाठी आवश्यक असलेले रॉड बसविण्यात आले नाही. त्याचबरोबर विहिरीच्या सभोवताल चबुतरा सुध्दा बनविण्यात आला नाही. परिणामी विहिरीत पाणी असले तरी ते काढणे शक्य होत नाही. त्यामुळे विहिरीत भरपूर पाणी असूनही गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरींचे बांधकाम नेमके कशामुळे अपूर्ण राहिले. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा केल्यास विहिरीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे बांधकाम अपूर्ण असल्याचे सांगून यासाठी पंचायत समिती जबाबदार असल्याचे सांगितले जाते. पंचायत समितीमध्ये विचारणा केल्यास ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. नेमक्या कोणाच्या चुकीमुळे विहिरींचे बांधकाम अपूर्ण राहिले. किंवा या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काय? हे कळायला मार्ग नाही. दुर्गम भागातील नागरिक विकास कामांबाबत फारशी तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा प्रशासनातील अधिकारी उचलत असल्याचे दिसून येत आहे.