पर्लकोटावरील पूल अर्धा किलोमीटरचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:21+5:30
केंद्र शासनाने आलापल्ली-भामरागड-लाहेरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या महामार्गावर हेमलकसा ते भामरागडदरम्यान पर्लकोटा नदी आहे. सदर नदी अगदी भामरागडला लागून आहे. या नदीवर असलेला सद्यस्थितीमधील पूल १९८५ मध्ये बांधला होता. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून वारंवार पाणी वाहून वाहतूक ठप्प पडत असल्याने भामरागडसह तालुक्यातील शंभरावर गावांचा संपर्क तुटतो.
रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पर्लकोटा नदीवर पूल बांधण्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून नवीन पुलाची लांबी ०.५७६ किमी म्हणजे आताच्या पुलापेक्षा जवळपास दुप्पट राहणार आहे. १ मार्चपासून प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असल्याचे राष्ट्रीयय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
केंद्र शासनाने आलापल्ली-भामरागड-लाहेरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या महामार्गावर हेमलकसा ते भामरागडदरम्यान पर्लकोटा नदी आहे. सदर नदी अगदी भामरागडला लागून आहे. या नदीवर असलेला सद्यस्थितीमधील पूल १९८५ मध्ये बांधला होता. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून वारंवार पाणी वाहून वाहतूक ठप्प पडत असल्याने भामरागडसह तालुक्यातील शंभरावर गावांचा संपर्क तुटतो. केंद्र शासनाने आलापल्ली-लाहेरी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्यानंतर पर्लकोटा नदीवर पूल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
कंत्राटदाराने नदी पात्रात माती परीक्षणाचे काम चार दिवसांपूर्वी सुरू केले होते. मात्र परवानगी घेतली नसल्याचे कारण सांगून वन विभागाने काम थांबविले आहे. परवानगी मागितल्यानंतर वन विभाग परवानगी देणार आहे. त्यामुळे पुलाचे काम अडणार नाही. दोन्ही विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सर्व अडसर दूर होतील. १ मार्चपासून प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यापर्यंत बांधकामासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने तोपर्यंत अर्ध्या पिलरचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने काम करणे शक्य होत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांनी मंगळवारी पुलाच्या प्रस्तावित कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आलापल्ली उपविभागाचे कनिष्ठ अभियंता धनपाल मंडपे उपस्थित होते.
सध्याच्या पुलापेक्षा दुप्पट लांबी
नवीन पुलाची लांबी ०.५७६ किलोमीटर राहणार आहे. या पुलाला २४ मीटरचे २४ गाळे राहणार आहेत. विद्यमान पूल २८८ मीटर रूंदीचा आहे. त्याला ८ मीटरचे ३६ गाळे आहेत. नवीन पुलाच्या जोडरस्त्यांची लांबी ०.५२४ किमी तर एकूण लांबी १.१० किमी राहणार आहे. हा पूल १६ मीटर रूंदीचा आहे. मात्र त्यात वहन मार्गाची रूंदी ११ मीटर राहणार आहे. या पुलाच्या बांधकामाची एकूण किंमत ७७.९८ कोटी रुपये आहे. छत्तीसगडमधील कंत्राटदाराकडून हे काम केले जाणार असून दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या पुलाच्या जोड रस्त्यांची लांबी गावात पोलीस स्टेशनच्या जवळपर्यंत राहणार आहे. पुलामुळे गाव दोन भागात विभागल्या जाण्याची शक्यता असल्याने पुलाला इतर रस्ते जोडले जातील.