नागपूर बसेसमध्ये निम्मेच प्रवाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 05:00 AM2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:27+5:30
गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी नागपूर येथून ये-जा करतात. तसेच प्रशासकीय कामे व माेठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे नागपूर मार्गावर धावणाऱ्या बसेसला चांगले उत्पन्न मिळत असल्याने दर अर्ध्या तासाने बस साेडली जाते. गडचिराेली आगारातून दिवसाला १६ फेऱ्या नागपूरसाठी साेडल्या जातात. जवळपास तेवढ्याच फेऱ्या नागपूरवरून गडचिराेलीसाठीही साेडल्या जातात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : नागपुरात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने नागपुरात काही निर्बंध लागू केले आहेत. इतर जिल्ह्यांमधून नागपुरात प्रवेश करणाऱ्या बसेसमध्ये निम्मेच प्रवाशी असावे, असा निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका गडचिराेली आगाराला बसत आहे. गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी नागपूर येथून ये-जा करतात. तसेच प्रशासकीय कामे व माेठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे नागपूर मार्गावर धावणाऱ्या बसेसला चांगले उत्पन्न मिळत असल्याने दर अर्ध्या तासाने बस साेडली जाते. गडचिराेली आगारातून दिवसाला १६ फेऱ्या नागपूरसाठी साेडल्या जातात. जवळपास तेवढ्याच फेऱ्या नागपूरवरून गडचिराेलीसाठीही साेडल्या जातात. या मार्गावर अधिक प्रवासी मिळत असल्याने गडचिराेली आगाराची बरीच भिस्त या मार्गावरून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे.
मात्र, काेराेनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नागपुरात बरीच निर्बंध घालण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर शहरात जाणाऱ्या बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी उमरेडपासूनच तपासणी केली जाते. केवळ २२ प्रवासी असल्यास डिझेलचाही खर्च भरून निघणे कठीण हाेत आहे. नागपुरातून येणाऱ्या बसेसमध्येही अर्धेच प्रवासी बसविले जात आहेत. याचा फटका गडचिराेली आगाराला बसत आहे.
लाॅकडाऊननंतर एसटी महामंडळाची स्थिती वाईट हाेत चालली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लावली जात असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. बसने प्रवास करण्याऐवजी नागरिक खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. नागपूरला जरी जायचे असले तरी भाड्याचे स्वतंत्र वाहन केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती काेलमडत आहे.
गडचिराेली आगारात दाेन शिवशाही
गडचिराेली आगाराला दाेन शिवशाही बसेस देण्यात आल्या आहेत. या बसेस पूर्णपणे वातानुकूलित आहेत. सामान्य बसपेक्षा या बसची तिकीट अधिक आहे. त्यामुळे या बसला फारसे प्रवासी मिळत नाही. उन्हाळ्यात थाेडेफार प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा आहे.
नागपूरमध्ये प्रवेश करतेवेळी बसमध्ये केवळ २२ प्रवासी असणे आवश्यक आहे. तशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याने एसटीकडून नियमांचे पालन केले जात आहे. मात्र निम्म्या प्रवाशांमुळे एसटीच्या उत्पन्नावर फार माेठा परिणाम हाेत आहे.
- मंगेश पांडे, आगार प्रमुख,
बसस्थानक गडचिराेली
१६ बसफेऱ्या राेज
गडचिराेली आगाराला सर्वाधिक उत्पन्न नागपूर बसफेऱ्यांमधून मिळते. त्यामुळे काही बसेस नागपूर येथे रात्री मुक्कामी राहतात. तसेच सकाळी ५.३० वाजेपासून बसेस नागपूरसाठी प्रत्येक अर्धा ते एका तासाने बसेस साेडल्या जातात.
नागपूरसाेबतच आरमाेरी, ब्रह्मपुरी, नागभिड, भिवापूर, उमरेड आदी परिसरात ये-जा करण्यासाठीसुद्धा प्रवासी याच बसेसचा वापर करतात.