निम्मे सत्र संपले; पण दोन तालुक्यांत शालेय गणवेशाचे अजूनही वाटप नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:37 PM2024-09-27T15:37:41+5:302024-09-27T15:38:47+5:30
जुन्याच कपड्यांवर शाळेची वारी : पुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडून होताहे दिरंगाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. महिनाभरानंतर हे सत्र संपून दिवाळीच्या सुट्याही लागतील; परंतु अजूनपर्यंत शालेय २८ हजारांवर विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे, तर भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचलेच नाहीत. गणवेश पुरवठा करणाऱ्या 'माविम' यंत्रणेचे नियोजन फिस्कटले की, शिक्षण विभागाचे हा चौकशीचा मुद्दा आहे.
मागील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा पुरवठा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. तेव्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच गणवेश पुरवठा करण्यात आलेला होता; परंतु यावर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे गणवेश वितरणाचे टेंडर दिल्याने गणवेश वितरणासाठी दिरंगाई होत आहे. जिल्हाभरातील शाळांना वेळेत गणवेश पुरवठा करण्यात शिक्षण विभागासह माविमच्या यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे.
६८,२३५ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
- जिल्ह्यात ६८ हजार २३५ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण होणार आहे. आतापर्यंत जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अजूनही २८ हजारांवर मुलांना गणवेश वाटप करण्यात आलेले नाही.
- २० सप्टेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ५८३ विद्यार्थ्यांनाच गणवेशाचा पुरवठा केलेला होता. भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचविण्यात आलेले नव्हते.
यंत्रणांचे एकमेकांवर खापर
शासनाकडून जवळपास एक महिना कापड उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे वेळेत कापड शिवून झाले नाही. पुरवठा कमी असल्याचे आढळल्याने अनेक मुख्याध्यापकांनी गणवेश परत केले, उशिरा पुरवठ्यामुळे गणवेश पुरवठा झाला नसल्याचे माविमचे म्हणणे आहे; परंतु मनुष्यबळ कमी असल्याचे कारण माविमचे अधिकारी देत नाही. केवळ एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. लवकर गणवेश पुरवठा न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राज बन्सोड यांनी दिला आहे.
गणवेश वितरणासाठी जुन्याच पटसंख्येचा आधार
- भरतीपात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन गणवेश वितरणासाठी नवीन पटसंख्येचा आधार घेऊन नियोजन करणे आवश्यक होते; परंतु गणवेश वितरणासाठी मागील शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून गणवेश वाटप सुरू करण्यात आले.
- त्यामुळे बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारण्यास नकार दिला. कमी गणवेशामुळे गणवेश कोणाला द्यायच हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारले असते तर मुलांना गणवेश मिळाला नाही अशा तक्रारी आल्या असत्या.