जलयुक्त शिवारची निम्मी कामे अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:21 AM2019-05-08T00:21:26+5:302019-05-08T00:22:31+5:30

जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारण व सिंचनाची कामे केली जातात. २०१८-१९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ५१९ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २ हजार ५१ कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाली आहेत. जवळपास निम्मी कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत.

Half of the water tank is still incomplete | जलयुक्त शिवारची निम्मी कामे अजूनही अपूर्णच

जलयुक्त शिवारची निम्मी कामे अजूनही अपूर्णच

googlenewsNext
ठळक मुद्दे४ हजार ५१९ कामे प्रस्तावित : मार्चअखेर २ हजार ५१ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारण व सिंचनाची कामे केली जातात. २०१८-१९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ५१९ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २ हजार ५१ कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाली आहेत. जवळपास निम्मी कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत.
गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेती व शेतीवर आधारित उद्योगावंर अवलंबून आहे. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकरी स्वत:च्या पैशातून सिंचनाची सुविधा उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे शासनाकडून विविध योजनाअंतर्गत सिंचनाची कामे केली जातात. विद्यमान शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने शेततळ्यांचे खोदकाम करणे, बोड्यांची दुरूस्ती करणे, जलसंधारणाची इतर कामे केली जातात.
२०१८-१९ या वर्षात १७२ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ४ हजार ५१९ कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी ३ हजार ३२९ कामांना सुरूवात झाली आहे. तर १ हजार २७८ कामे प्रगतीपथावर आहेत. २ हजार ५१ कामे पूर्ण झाली आहेत.
जलयुक्त शिवारच्या कामांच्या माध्यमातून शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. जलयुक्त शिवारची कामे प्रामुख्याने उन्हाळ्यात केली जातात. त्यामुळे रिकाम्या वेळात रोजगार उपलब्ध होत असल्याने या कामांना विशेष महत्त्व आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणाऱ्या कामांमुळे सिंचनाची सुविधा वाढण्यास मदत होत असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडून सदर कामांची मागणी वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६०० गावे आहेत. त्यापैकी १७२ गावांची निवड जलयुक्त शिवारसाठी करण्यात आली आहे. इतर गावे मात्र या योजनेपासून वंचित आहेत.
कृषी विभागाला सर्वाधिक कामे
जलयुक्त शिवार अभियान योजना प्रामुख्याने कृषी विभागामार्फत राबविली जाते. कृषी विभागासाठी २०१८-१९ या वर्षात २ हजार २२८ कामे प्रस्तावित करण्यात आली. जिल्हा परिषदेअंतर्गत २५०, वनविभागाअंतर्गत १ हजार ९२४, जि.प.सिंचाई ७२, जलसंधारण विभागाअंतर्गत ४२, जलसंपदा विभागाअंतर्गत तीन कामे प्रस्तावित करण्यात आली होती. जलसंपदा विभागाची तर तीन कामे सुरूच झाली नाही. तर जलसंधारण विभागाचे एकही काम पूर्ण झाले नाही.

Web Title: Half of the water tank is still incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.