अर्ध्यावरती डाव मोडिला, अधुरी एक कहाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:42+5:30
गेल्या तीन-चार दिवसांपासून दुर्गाची प्रकृती बरी नसल्याने तिला चक्कर आली होती. त्यामुळे औषधोपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्गाची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर तिच्याशी लग्न जुळलेला युवकही गडचिरोलीत आला. दवाखान्यात भरती करण्याच्या दिवसापासून तर दुर्गा अखेरचा श्वास घेईपर्यंत हा युवक तिच्यासोबत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लग्न जुळल्यानंतर सुखी संसाराचे स्वप्न उपवर-वधू पाहात असतात. यादरम्यान सुरू होणाऱ्या संवादातून मानसिक व भावनिक नाते अधिक घट्ट होते. आपले लग्न कुटुंबीय व आप्तेष्ठांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात होईल, अशी अपेक्षा असते. तसेच स्वप्नही ते रंगवत असतात. असेच स्वप्न दुर्गा व तिच्या होणाऱ्या पतीने पाहिले होते. मात्र नियतीने दुर्गावर अकाली झडप घातली. लग्न ठरलेल्या दिवशी दुर्गा सर्वांना सोडून कायमची गेली. त्यामुळे अहेरी येथील ‘त्या’ युवकाच्या कहाणीच्या सुरूवातीला शेवट झाला.
ही हृदयद्रावक घटना १ जून रोजी सोमवारी घडली. अहेरी येथील लग्न जुळलेल्या मुलाशी बोहल्यावर चढून वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याआधीच शहराच्या हनुमान वॉर्डातील रहिवासी दुर्गा गुरनुले (२९) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. गेल्या तीन-चार दिवसांपासून दुर्गाची प्रकृती बरी नसल्याने तिला चक्कर आली होती. त्यामुळे औषधोपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्गाची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर तिच्याशी लग्न जुळलेला युवकही गडचिरोलीत आला. दवाखान्यात भरती करण्याच्या दिवसापासून तर दुर्गा अखेरचा श्वास घेईपर्यंत हा युवक तिच्यासोबत होता. दरम्यान तो युवक दुर्गाची दवाखान्यात खूप काळजी घेऊन तिला धीर देत होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
१ जून रोजी दुर्गा विवाहबद्ध होणार होती. मात्र याच दिवशी तिला काळाने हिरावून नेल्याने तिच्या कुटुंबासह सासरकडील मंडळी व वॉर्डवासीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दुर्गाच्या होणाऱ्या पतीचे अहेरी येथे आलापल्ली मार्गावर दुकान आहे. दुर्गाच्या अंत्यसंस्काराला तिच्या सासरकडील मंडळींनीही उपस्थिती लावली. त्यांनाही दु:ख अनावर झाले होते.
दुर्गाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
दोन मुलीच्या अकाली जाण्याने कुटुंबावर आघात
गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील गुरनुले कुटुंबात तीन मुली जन्माला आल्या. दुर्गाला दोन बहिणी होत्या. मोठी बहिण परिचारिका होती. मात्र चार वर्षांपूर्वी गरोदरपणात तिचा मृत्यू झाला होता. आता हृदयविकाराच्या झटक्याने दुर्गाचा मृत्यू झाल्याने गुरनुले कुटुंबावर आघात झाला. दोन मुलींचे अकाली निधन झाल्याने आईवडील व आप्तेष्ठांनी हंबरडा फोडला.