गडचिरोलीतील हस्तकलेच्या वस्तू पोहोचणार विदेशात, सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 05:30 PM2018-02-06T17:30:25+5:302018-02-06T17:33:20+5:30
बांबू, काष्ठशिल्प कलेत निपुण असणा-यांनी बनविलेल्या वस्तू अप्रतिम असल्या तरी मार्केटिंगअभावी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. परिणामी त्या वस्तूंचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. मात्र आता...
गडचिरोली : जिल्ह्यातील बांबू, काष्ठशिल्प कलेत निपुण असणा-यांनी बनविलेल्या वस्तू अप्रतिम असल्या तरी मार्केटिंगअभावी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. परिणामी त्या वस्तूंचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. मात्र आता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे. त्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीने पुढाकार घेतला आहे. गडचिरोलीतील एकता सामाजिक शिक्षण संस्थेने व्हॅल्युबिट इंटरनॅशनल व्हेन्चर्स प्रा.लि. सिंगापूर या कंपनीशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. त्या कंपनीनेही त्यासाठी स्वारस्य दाखविले. त्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला गडचिरोलीच्या इंदिरा गांधी महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात गडचिरोलीसह इतर राज्यातील हस्तकला उत्पादन ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने चर्मकला, काष्ठशिल्पकला, बांबूकला, धातूकला, मातीकला, विणकामकला यासह वनौषधीही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. सिंगापूरच्या कंपनीचे अधिकारी या प्रदर्शनाची पाहणी करून हस्तकला वस्तूंच्या विक्रीसंदर्भात संबंधितांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. योग्य वाटणा-या वस्तूंना विदेशी मार्केटमधील मॉलपर्यंत नेण्यासाठी ही कंपनी मदत करणार आहे. या प्रदर्शनात आपल्या हस्तकलांचे नमुने सादर करण्याचे आवाहन एकता सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रकाश अर्जुनवार यांनी केले आहे.