राहत्या घरालाच बनविली हाेती दारूभट्टी; पाेलिसांनी धाड टाकून केली उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:36 AM2021-09-13T04:36:04+5:302021-09-13T04:36:04+5:30
कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले चव्हेला हे गाव अतिशय दुर्गम व संवेदनशील क्षेत्रात आहे. चव्हेला येथे मोठ्या प्रमाणात ...
कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले चव्हेला हे गाव अतिशय दुर्गम व संवेदनशील क्षेत्रात आहे. चव्हेला येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीद्वारे मोहफूलाची दारू गाळून अवैध विक्री केली जाते, अशी माहिती कुरखेडा पोलिसांना प्राप्त होताच रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलिसांनी गावात धडक दिली. यावेळी दीपक सुखदेव पदा (२५) याच्या घरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीत ६०० लिटर दारू आढळून आली. सदर दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. तसेच ९ हजार रुपये किमतीचे साहित्य असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याशिवाय चव्हेला येथीलच पतिराम सोमा खुरसाम (४०) याच्या घरावर धाड टाकली असता तेथेसुद्धा अवैध हातभट्टी सुरू हाेती. येथून १२० लिटर दारू आढळली. सदर दारूची किंमत २४ हजार रुपये आहे. तसेच ३ हजार २०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. दाेन्ही आराेपींकडून १ लाख ४४ हजार रुपयांची ७२० लिटर मोहफूल दारू व दारू गाळण्यासाठी वापरलेले १२ हजार २०० रुपये किमतीचे ड्रम व जर्मन हंडे जप्त करण्यात आले. पाेलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार अभय आष्टेकर, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोलीस हवालदार गौरीशंकर भैसारे, पोलीस शिपाई ललित जांभुळकर, भोजराज शिंदे, शैलेश राठोड यांच्या चमूने केली.