असे घडले सत्ता स्थापनेचे नाट्य
By admin | Published: March 22, 2017 01:50 AM2017-03-22T01:50:06+5:302017-03-22T01:50:06+5:30
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात पूर्वीच आघाडी झाली होती.
रात्रभर चालली उलथापालथ : धर्मरावबाबांशी चर्चेनंतर आविसंला मिळाले उपाध्यक्षपद
गडचिरोली : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात पूर्वीच आघाडी झाली होती. या आघाडीसोबत गडचिरोली तालुक्यातून निवडून आलेल्या अपक्ष सदस्यही होत्या. त्यामुळे बहुमताचे संख्याबळ भाजपजवळ जुळलेले होते. त्यामुळे सोमवारी नागपुरात चर्चेचा खल सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जगन्नाथ बाजीराव बोरकुटे यांनी आपल्याला उपाध्यक्ष पद मिळाले पाहिजे, अशी अट घातली. सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोरकुटेंच्या या अटीला नकार दिला होता. मात्र सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बोरकुटे यांच्या उपाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी याला होकार दिला होता. मात्र त्याचवेळी भाजपकडे असलेल्या अपक्ष सदस्य वर्षा कौशीक यांनी आपल्याला अध्यक्ष पद मिळायला हवे, असा दावा भाजप नेत्यांकडे त्यांच्या यजमानांच्या मार्फतीने केला. त्यामुळे भाजपचा पेच वाढला. आपण २० चे संख्याबळ असूनही सत्तेपासून दूर राहू शकतो, याची चाहूल भाजपला लागली. त्यामुळे रात्री साडेनऊ वाजतानंतर भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपातकालीन बैठक घेत परिस्थितीवर पूर्ण गंभीरतेने चर्चा केली व त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघाला आपल्यासोबत घेतले पाहिजे, यावर त्यांचे एकमत झाले. त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. दीपक आत्राम यांनी आविसंला उपाध्यक्ष पद मिळेल तर आपल्यासोबत येणे शक्य होईल, असे भाजपला सांगितले. त्यानंतर लगेच भाजप नेत्यांनी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ मोठे मन करीत राष्ट्रवादी काँग्र्रेस भाजपसोबतच राहिल, असे स्पष्ट केले व उपाध्यक्ष पदावरचा आपल्या पक्षाचा दावा त्यांनी सोडला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत घेण्यात भाजपला सहज सोपे झाले. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याने आपल्या पक्षाची सत्ता कुठल्याही परिस्थिती स्थापन झाली पाहिजे, ही भाजपच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गडचिरोली जिल्ह्याच्या या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रात्री १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व आविसं यांचे सत्ता समिकरण जुळण्याचा मार्ग मोकळा झाला. (जिल्हा प्रतिनिधी)