हार्वेस्टरने हरविली धान मळणीची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:53 PM2019-05-04T23:53:10+5:302019-05-04T23:53:46+5:30

धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातील खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे.

Harvester Harry Paddy Thawing Fun | हार्वेस्टरने हरविली धान मळणीची मजा

हार्वेस्टरने हरविली धान मळणीची मजा

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । उन्हाळी धान पिकाच्या मळणीसाठी हार्वेस्टर यंत्र विसोरा परिसरात झाले दाखल

अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातील खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे.
रोजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्रांनी मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो, असा दृढ समाज मानवाचा होता. मात्र हा समज यंत्रांनी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हाच एकमेव मळणी यंत्र होता. पुढे ट्रॅक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे, हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे. हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.
कृषी क्षेत्रात यंत्रे आल्याने शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. खरीप हंगामात ट्रॅक्टरवर चालणारे साधे मळणी यंत्र वापरले जाते. मात्र उन्हाळी धान पिकासासाठी विसोरा परिसरातील बहुतांश शेतकरी हार्वेस्टरचाच वापर अधिकाधिक प्रमाणात करीत असल्याचे दिसून येते.

खर्च वाढला मात्र उत्पादन तेवढेच
पूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे सर्व कुटुंब शेतात राबत होते. त्यामुळे शेतीचा खर्च अतिशय कमी होता. रोवणी, कापणी, बांधणी, मळणी ही कामे कुटुंबातील सदस्य स्वत: करीत होते. खते व कीटकनाशकांच्या खरेदीवरच खर्च होत होते. मात्र आता धानाच्या रोवण्यापासून ते मळण्यापर्यंत यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. मात्र उत्पादनात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यामुळे शेती तोट्याची ठरत आहे.
काय आहे हार्वेस्टर यंत्र
उन्हाळी धान पिकाची कापणी उन्हाळ्यात होते. कडक उन्हाळ्यात धान पिकाची मळणी करणे शक्य होत नाही. कापणी व बांधणी करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. हार्वेस्टर यंत्र धानाची कापणी करतात. त्याच वेळी मळणी सुध्दा होते. मळणी झालेले धान यंत्राच्या डब्यात एका ठिकाणी जमा होते. एकाच वेळी सर्व कामे होत असल्याने शेतकरी वर्ग हार्वेस्टर यंत्राच्या वापराला पसंती दर्शवित आहेत.

Web Title: Harvester Harry Paddy Thawing Fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.