फेरीवाले आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:22+5:302021-05-21T04:39:22+5:30
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे छाेटे व्यावसायिक, फुटपाथ दुकानदार व फेरीवाल्यांवर आर्थिक संकट काेसळले. दाेनदा संचारबंदी लागू झाल्याने वर्षभराचा ...
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे छाेटे व्यावसायिक, फुटपाथ दुकानदार व फेरीवाल्यांवर आर्थिक संकट काेसळले. दाेनदा संचारबंदी लागू झाल्याने वर्षभराचा धंदा बुडाला. दरम्यान, त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची घाेषणा करण्यात आली. मात्र ही मदत अजूनही फेरीवाल्यांना मिळाली नाही. जिल्ह्याच्या शहरी भागातील १२५० वर फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
शेणखताच्या ढिगाऱ्यांमुळे आराेग्य धाेक्यात
भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील मुरखळा-कान्होली मार्गावर मुरखळा गावातील शेतकरी अनेक वर्षांपासून शेणखताचे ढिगारे टाकतात. त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. गावापासून काही अंतरावर शेणखताचे ढिगारे दिसून येतात. उंच असलेल्या ढिगांवरून कचरा खाली उतरून रस्त्यापर्यंत पाेहाेचतो. रस्ता अरुंद होत चालल्यामुळे रस्त्याने वाहन आले, तर बाजूला सरकण्यास जागा राहत नाही. दोन्ही बाजूंना शेतजमीन आहे. पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतकरी कुंपण करतात. रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याने ये-जा करणे तारेवरची कसरत होत चालली आहे. शेणखताचे ढिगारे हटवावेत, अशा सूचना अनेक वेळा संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, आम्हाला पर्यायी जागा नसल्याने रस्त्यावर शेणखताचे ढिगारे टाकावे लागत आहेत, असे शेतकरी सांगतात.
भामरागड तालुक्यात माेबाइल इंटरनेट सेवा ठरली कुचकामी
भामरागड : तालुक्यात इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. थ्री-जी सेवा काम करीत नसल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वत्र फोर-जी सेवेचा वापर होत असताना भामरागड तालुका अद्यापही थ्री-जी सेवेचा आधार घेऊन आहे. यातही अनियमित सेवा मिळत असल्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहेत. टू-जी सेवा सुरू असून इंटरनेटची गती मंदावलेली असल्याने अनेक कामांवर परिणाम होत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रचंड हळू राहत असल्याने ऑनलाइन कामे रखडत आहेत. आधीच अतिदुर्गम भाग असलेल्या तालुक्यात माेबाइल टाॅवर अत्यल्प आहेत. त्यातच पुन्हा वारंवार कव्हरेज व इंटरनेट सेवा विस्कळीत हाेत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
महा ई-सेवा केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज
अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महा ई सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० कि.मी.चे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा ई सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. शासनाच्या बहुतांश याेजनांचा लाभ याच केंद्रावरून घेतला जातो. महा ई सेवा केंद्र नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
बनावट बिलाच्या वापरामुळे ग्राहकांची लूट
गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार बनावट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. जीएसटीचे बिल मागितल्यास दुकानदार अधिकची किंमत मागतात.
गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता या मार्गाची रुंदी वाढविण्याची मागणी आहे.
अगरबत्तीनिर्मिती मजुरी वाढवा
गडचिरोली : वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. त्यामुळे मजूर त्रस्त आहेत.
आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी
आलापल्ली : येथील अनेक वॉर्डांतील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डांत डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.
काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात
मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भूमिअभिलेखची पदे रिक्त
एटापल्ली : उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.
पूलनिर्मितीची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलांचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
कमलापुरात रुग्णवाहिकेची गरज
कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून, या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह परिसरातील नागरिक येत असतात.
अहेरीत वाहतूककोंडी
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.