फुटपाथ दुकानदारांसाठी होणार हॉकर्स झोन
By admin | Published: July 15, 2016 01:40 AM2016-07-15T01:40:20+5:302016-07-15T01:40:20+5:30
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरात अतिक्रमण करून रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटलेल्या दुकानदारांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण केले जाणार आहे.
प्राथमिक सर्वेक्षण अंतिम टप्प्यात : गडचिरोली शहरात एक हजार व्यावसायिकांना दिलासा मिळणार
दिगांबर जवादे गडचिरोली
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरात अतिक्रमण करून रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटलेल्या दुकानदारांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण केले जाणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण करण्याचे काम नगर परिषदेच्या वतीने हाती घेतले आहे.
प्रत्येक बेरोजगार युवकाला रोजगार मिळावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न चालविले जात आहेत. मात्र ज्या व्यक्तींना लहान-मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. तो व्यवसाय मात्र अतिक्रमणाच्या मोहिमेत नष्ट होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजुला वाढत्या अतिक्रमणामुळे अपघातांचेही प्रमाण वाढत चालले आहे. अतिक्रमण काढल्यास हातचा रोजगार हिसकावल्या जाईल व बेरोजगारांची संख्या वाढेल. हा सुद्धा धोका समोर येत आहे. या अतिक्रमीत दुकानदारांना त्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी आता केंद्र शासनाने पाऊल उचलणे सुरू केले आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुरू केले असून या अभियानातील फेरीवाला धोरण अंतर्गत अशा अतिक्रमीत दुकानदारांसाठी स्वतंत्र इमारत बांधून देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी हॉकर्स झोन तयार केले जाणार आहे. यासाठी शहरातील अतिक्रमण करून दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे. आजपर्यंत जवळपास ६०० दुकानदारांचा सर्वेक्षण करण्यात आला असून या सर्वेक्षणमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव तो कोणता व्यवसाय करीत आहे, कुठे व्यवसाय करीत आहे, किती वर्षापासून व्यवसाय चालवित आहे, त्याच्या शैक्षणिक व कौटुंबिक माहिती मागितली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे शहरातील अतिक्रमीत दुकानांचा अंदाज घेऊन त्यानुसार पुढील रूपरेषा आखली जाणार आहे. व्यवसायानुसार स्वतंत्र हॉकर्स झोन तयार केले जाणार असल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी वस्तू मिळणार आहे.
बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार
प्राथमिक सर्वेक्षणामध्ये केवळ नाव, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता यांची माहिती मागितली आहे. प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सदर दुकानदारांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये दुकानाचा फोटो, दुकानदाराचा फोटो, त्याचा आधार कार्ड, त्याचा थंब, शैक्षणिक दाखले व घेतले जाणार आहेत. त्यानंतर सदर दुकानदारांना नगर परिषदेच्या वतीने व्यवसायाबाबातचे ओळखपत्र सुध्दा दिले जाणार आहे.
एक हजाराहून अधिक व्यावसायिकांना मिळणार लाभ
नगर परिषदेने चारही मुख्य मार्गावरील अतिक्रमीत दुकानदारांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये जवळपास ६०० दुकानदार आढळून आले आहेत. शहराच्या अंतर्गत भागात जवळपास ४०० अतिक्रमणधारक व्यावसायिक असण्याची शक्यता आहे. असे एकूण जवळपास एक हजार दुकानदारांना याचा लाभ मिळणार आहे.