पुलावरून धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:52 AM2018-07-08T00:52:33+5:302018-07-08T00:54:10+5:30
अहेरी तालुक्यातील झिमेलानजीक असलेल्या पाईपच्या कमी उंचीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना खड्ड्याचा अडसर असतानाही धोकादायक वाहतूक सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील झिमेलानजीक असलेल्या पाईपच्या कमी उंचीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना खड्ड्याचा अडसर असतानाही धोकादायक वाहतूक सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
झिमेला हे गाव तिमरम ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ५०० च्या आसपास येथील लोकसंख्या आहे. यागावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात नेहमीच आवागमनासाठी त्रास सहन करावा लागतो. परंतु या समस्येकडे शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. झिमेलालगत असलेल्या छोट्या नाल्यावर सिमेंट पाईप टाकून छोटा रपटा तयार करण्यात आला आहे. या पाईपमधून पाणी वाहत असते. जोरदार पाऊस झाल्यानंतर रपट्यावरून पाणी वाहते. परिणामी या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
सिमेंट पाईप पडले उघडे
रपट्यावरील सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने पाईप उघडे पडले आहेत. शिवाय मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहन जाण्यास अडचणी येत आहेत. दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहने येथून काढताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या दुरवस्थेत असलेल्या या नाल्याच्या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. यंदाच्या पहिल्याच पावसात पुलावरील सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने दुरवस्थेत आणखी भर पडली.