दिव्यांगांसाठी 350 गुन्हे डोक्यावर घेऊन फिरतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:53 AM2023-09-29T08:53:19+5:302023-09-29T08:54:16+5:30
बच्चू कडू : १७ जिल्ह्यांत गेलो, दिव्यांगांच्या दारी अभियानात दोनच ठिकाणी आमदार
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिव्यांगांच्या कल्याणासाठी डोक्यावर साडेतीनशे गुन्हे घेऊन फिरतो, चार गुन्ह्यांत दोन वर्षांची शिक्षाही झाली. मात्र, दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत १७ जिल्ह्यांत गेलो; पण दोनच ठिकाणी आमदार कार्यक्रमांना उपस्थित होते, अशा शब्दांत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली.
दिव्यांग या व्यक्ती पहाडाएवढे दु:ख घेऊन जगतात, त्यांच्या वेदना समजून घ्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम आरमोरी रोडवरील संस्कृती लॉनमध्ये २७ सप्टेंबरला झाला. यावेळी आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, जि. प. सीईओ आयुषी सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची उपस्थिती होती.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, १५ वर्षांपासून दिव्यांगांच्या न्याय-हक्कासाठी लढत आहे. विधानसभेत एकही भाषण दिव्यांगांचा शब्द उच्चारल्याशिवाय केलेले नाही. या दरम्यान ३५० गुन्हे नोंद झाले. चार गुन्ह्यांत दोन वर्षांची शिक्षा झाली; पण ८२ शासन निर्णय काढण्यात यश आले. दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी खर्च झाला पाहिजे, त्यांना सोयी- सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सगळीच कामे राजकारणासाठी करायची नसतात तर कर्तव्य म्हणूनही करावी लागतात, हे कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांंगांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. जि. प. सीईओ आयुषी सिंह, आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी यांची भाषणे झाली. दीड हजारांवर लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. मित्र संस्थेचे अभिजित राऊत यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
उपमुख्यमंत्र्यांसह खासदार, मंत्रीही अनुपस्थित
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. रामदास अंबटकर निमंत्रित होते; पण या सर्वांचीच अनुपस्थिती होती.