बचतगटांच्या ५१ प्रभाग संघांसाठी सभागृहाची व्यवस्था करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:31+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी यशस्वी महिला बचतगटांचा आवर्जुन उल्लेख केला. बचतगटातील काही सदस्य महिला मोठमोठे उद्योग करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. नावीण्यपूर्ण योजनांचा लाभ घेऊन महिला विकासात पुढे येत आहेत, असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प.सभापती रमेश बारसागडे यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण १४ हजार महिला बचतगट आहेत. या बचतगटांचे ६८६ ग्रामसंघ असून या ग्रामसंघाअंतर्गत ५१ प्रभाग संघ आहेत. महिला बचतगटाची चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी तसेच या गटातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातील. बचतगटांच्या विविध नियोजन बैठकांसाठी या ५१ प्रभाग संघासाठी आपण सभागृह व हक्काची इमारत उभारण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प.गडचिरोलीच्या वतीने २८ ते १ मार्चदरम्यान स्थानिक चंद्रपूर मार्गावरील लॉनवर गोंडवन महोत्सव तथा महिला बचतगटांच्या वस्तूंची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, समाजकल्याण सभापती रंजीता कोडाप, महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, श्रावण आतला, प्रभाकर तुलावी, लता पुंगाटी, कुरखेडाच्या बीडीओ अनिता तेलंग, कोरचीचे बीडीओ व्ही.एम. देवारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजय कंकडालवार म्हणाले, बचतगटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला विविध प्रकारच्या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील महिला आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम झाल्या पाहिजे. बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी जिल्हास्तरावर नेहमीसाठी विक्री केंद्र असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी यशस्वी महिला बचतगटांचा आवर्जुन उल्लेख केला. बचतगटातील काही सदस्य महिला मोठमोठे उद्योग करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. नावीण्यपूर्ण योजनांचा लाभ घेऊन महिला विकासात पुढे येत आहेत, असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प.सभापती रमेश बारसागडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून डीआरडीचे प्रकल्प संचालक माणिक चव्हाण यांनी जिल्हाभरातील बचतगटांची व त्यांच्यामार्फत सुरू असलेल्या व्यवसायांची माहिती दिली. संचालन प्रा. किशोर गलांडे यांनी केले आभार उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक चेतना लाटकर यांनी मानले.
प्रदर्शनीत जिल्हाभरातून १५७ स्टॉलचा समावेश
महिला स्वयंसहाय्यता गट व वैयक्तिक स्वरूपात स्वयंरोजगार उभारून तयार केलेल्या वस्तूंच्या या जिल्हास्तरीय प्रदर्शनीत बाराही तालुक्यातून एकूण १५७ स्टॉल विविध वस्तूंचे लावण्यात आले आहे. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या चकल्या, मसाल्याचे पदार्थ, मोहाची पुरनपोळी, मद, आंबाडी सरबत, मातीचे भांडे, बांबूंच्या वस्तू यासह इतर वस्तू या प्रदर्शनीतील स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. संबंधित महिला बचतगटाने आपल्या स्टॉलची नोंदणी प्रशासनाकडे केली आहे.